अनुप मोरे यांची भाजयुमो महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. धडाडीच्या आणि नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर पक्षाची बांधणी आणि आखणीची धुरा सोपविताना भाजप दिसत आहे. त्याचाच प्र्त्येय आज आला. संघटन वाढ आणि युवकांची फौज पाठीशी असणारे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री अनुप मोरे यांची भाजयुमो महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महासचिव विक्रांत पाटील आणि प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांची निवड करण्यात आली आहे.
युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुण, युवा पिढी यांच्यासमोर स्वतःची प्रतिमा जपण्याचं काम अनुप मोरे यांनी केलं. त्यामुळे त्यांच्याशी युवा पिढी थेट कनेक्ट आहे. त्याचा पक्षालाही फायदाच झाला आहे. आगामी निवडणुकांच्या मुहूर्तावर अनुप मोरे यांच्यावर सोपविलेली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यामुळेच महत्वपूर्ण आहे. निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पक्षनिष्ठा जपणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्याला आज खऱ्या अर्थाने पक्षाने मोठं केल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात रविवारी (दि. ११) रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुप मोरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करत असल्याबाबतची घोषणा केली. तसेच त्यांना निवडीचे पत्रही दिले. यावेळी विक्रांत पाटील, राहुल लोणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम आणि सजग असला पाहिजे. तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत घटकापर्यंत पोहोचून शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पार्टीचे काम पोहोचविण्यासाठी त्याने प्रयत्नशील असावे. पंतप्रधान मोदींच्या योजना महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना यावेळी बावनकुळे केल्या.
भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या सरचिटणीस पदावर अनुप मोरे यांना सर्वप्रथम काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना विद्यार्थी आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिली. या पदांवर राहून त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या कामाचा आवाका पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी निवड करून त्यांना शहर पातळीवर नेतृत्व करण्याची संधी दिली. भाजपा शहर सरचिटणीस त्यानंतर प्रदेश पातळीवर त्यांची निवड केली. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष, त्यानंतर युवा वॉरियर्सचे प्रदेश संयोजक या पदांवर राहून त्यांनी राज्यभर कार्यकत्यांची एकजूट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.














