महापालिकेच्या वतीने ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या उपक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील विविध उपाययोजना, उपक्रम, प्रकल्प यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अभिप्राय नोंदवावेत. तसेच १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असे आवाहन जनसंवाद सभेच्या माध्यमातून आज करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग नोंदवत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १९, १४,३,१४,१,७,१२ आणि ८ अशा एकूण ७८ तक्रारी वजा सूचना मांडल्या.
सर्व क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत विविध तक्रारी नागरिकांनी मांडल्या. यामध्ये सीसीटीव्ही सुरु करणे, पावसामुळे झालेले खड्डे बुजवणे, कच-याचे व्यवस्थापन करणे, मुळा पवना नदीत होत असलेले प्रदूषण रोखणे, राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे, अनधिकृत पार्किंग, होर्डिंग वर कारवाई करणे, अशा विविध समस्या मांडण्यात आल्या.
‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिकेस रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्याने आणि क्रीडांगणे आणि सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा नव्याने मागणी करण्यासाठी मदत होणार आहे. हा उपक्रम ऑफलाईन पद्धतीने सुरू असून अर्ज जमा करण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयांना भेट द्यावी लागते. यामुळे नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी २०२४ या आर्थिक वर्षापासून स्मार्ट सारथी ॲप आणि महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांनी त्यांचा अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
तसेच १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या अनुषंगाने घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी आपल्या घरावर १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकवावा, तिरंगाचा अपमान होणार नाही यासाठी यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.