ताज्या घडामोडीपिंपरी

विद्यार्थ्यांचा ‘एमआयटी’ ब्रँडवर विश्वास पद्मभूषण डाॅ.विजय कुमार सारस्वत

Spread the love

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा स्थापना दिन उत्साहात

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच नाविण्यपूर्ण व त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणारे शिक्षण देण्याची गरज आहे. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत भर घालणारे व संशोधनास प्रवृत्त करणारे शिक्षण पुरवत असताना, त्यांना सांस्कृतीक मुल्ये देखील पुरवायला हवीत. ज्यातून त्यांच्यात राष्ट्रविषयीचे प्रेम आणि समर्पणाची भावना आपसुकच तयार होईल. एमआयटी एडीटी विद्यापीठ देखील अगदी अशाच प्रकारे शिक्षण देत असल्याने, विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा एमआयटी ब्रँडवरील विश्वास वृद्धींगत होत आहे, असे प्रतिपादन भारतीय निती आयोगाचे सदस्य तथा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(डीआरडीओचे) माजी चेअरमन पद्मभूषण डाॅ.विजय कुमार सारस्वत यांनी व्यक्त केले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या ९व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी, व्यासपीठावर, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ. विरेंद्र शेटे, डाॅ.नचिकेत ठाकूर, डाॅ.विपुल दलाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डाॅ.मंगेश कराड यावेळी म्हणाले, नुकताच माईर्स शिक्षण समुहाने आपला ४२ स्थापना दिन साजरा केला. प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयटी एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासावर भर देणारे शिक्षण पुरवत आहे. या विद्यापीठाच्या जडणघडणीत येथील प्रत्येक कर्मचाऱ्याचे बहुमुल्य योगदान आहे. त्यामुळे, भविष्यात विद्यापीठ यशाच्या नव-नव्या शिखरांवर पोचेल याचा विश्वास आहे.
विश्वशांती प्रार्थना सुरुवात तर राष्ट्रगीताने समारोप झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.पुजेरी यांनी तर आभार डाॅ.दुबे यांनी मानले. तर सुत्रसंचलन श्रद्धा वाघटकर व स्वप्नील शिरसाठ यांनी केले.

कुठल्याही गोष्टीला उशीर करण्याची भारतीयांची सवय वाईट आहे. ज्यामुळे, संस्थेच्या रेपुटेशनवर परिणाम होतो. अमेरिकेतील फुल्टन सभागृहात मी भाषण देत असताना समोर तब्बल ३० हजारांहून अधिक जनसमुदाय बसलेला असतानाही सर्वांच्या नजरा आणि कान माझ्याकडे होते. अशाच प्रकारची शिस्त आपण स्विकारण्याची आता आवश्यकता आहे. कारण, भारतात विश्वगुरु बनण्याची क्षमता आहे. परंतू केवळ बोलण्याने ते होणार नाही. त्यासाठी आवश्यक असणारी शिस्त, मुल्य अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे.
*- प्रा.डाॅ. विश्वनाथ दा. कराड,*
संस्थापक अध्यक्ष, माईर्स एमआयटी शिक्षण समुह

चौकट
डाॅ.अनंत चक्रदेव यांना जीवनगौरव पुरस्कार
याप्रसंगी प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव यांना विद्यापीठाच्या जडणघडणीतील बहुमुल्य योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्यासह डाॅ.विरेंद्र भोजवानी, डाॅ.रजनीश कौर रचदेव बेदी, डाॅ.ज्ञानदेव नीलवर्ण, डाॅ.समाधान कुंभार, डाॅ. श्रीकांत गुंजाळ, डाॅ.सुराज भोयार, डाॅ.अविनाश कदम यांचाही विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. याप्रसंगी डाॅ.चक्रदेव यांनी केलेल्या भाषणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button