रक्तदानाद्वारे ‘माईर्स’चा स्थापना दिवस साजरा
लोणी-काळभोर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माईर्स एमआयटी शिक्षण समुहाच्या ४२ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने येथील एमआयटी एमआयटी आर्ट, डिझाईन, आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात, विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदानासारख्या सामाजिक मोहिमेला विद्यापीठात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह, कर्मचाऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. ज्यामुळे, शिबिराअंती तब्बल १०० हून अधिक रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन समारंभात डॉ. अतुल पाटील, संचालक एमआयटी स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट; प्रा. हनुमंत पवार, सीईओ पेरा इंडिया; प्रा. डॉ. सुरज भोयर, संचालक – विद्यार्थी व्यवहार; डॉ. सुरेश पारधे, रक्त संक्रमण अधिकारी, जिल्हा रुग्णालय, औंध पुणे; डॉ. इम्रान खान, रक्त संक्रमण अधिकारी, ससून रुग्णालय, पुणे; डॉ. अजय हुपले; श्री. शरद देसले, सामाजिक सेवा अधीक्षक, ससून रक्तपेढी; आणि श्री. सुदाम भाकडे यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित प्रत्येक मान्यवराने रक्तदानाचे महत्व विशद करताना, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या सामाजिक उपक्रमाचे व विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधीलकीचे भरभरून कौतुक केले.
एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करून महविद्यालयीन जिवनाच्या सुरुवातीलाच आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. ससून रुग्णालय रक्तपेढीच्या माध्यमातून झालेल्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एमआयटी एडीटी- अँडव्हेंचर क्लबच्या स्वयंसेवकांनी अत्यंत हिरीरीने सहभाग नोंदवत, विद्यार्थ्यांच्या मनातील रक्तदानाविषयीचे गैरसमज दूर करताना त्यांना रक्तदान करण्यास प्रवृत्त केले.