विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचा समारोप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षी महापालिकेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्वाच्या माध्यमातून शहरातील नागरीक तसेच तरूण पिढी मोठ्या संख्येने या महापुरूषाच्या कार्याचा, विचारांचा जागर करण्यासाठी एकत्र येत असतात. या एकोप्यातून शहरातील लोकांचे या महापुरूषांबद्दल असलेले अभूतपुर्व प्रेम दिसून येते. हळूहळू संपुर्ण महाराष्ट्रातून लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी येत आहेत. येत्या काही वर्षात या कार्यक्रमाचे स्वरूप आणखी व्यापक होईल व महापुरूषांच्या कार्याचा तसेच त्यांच्या विचारांचा प्रसार स्थानिक तसेच महाराष्ट्रातील कलाकारांच्या माध्यमातून घराघरात होईल, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील प्रांगणात करण्यात आले होते. या ५ दिवसीय प्रबोधनपर्वाचा समारोप विविध मराठी सिनेकलाकारांच्या उपस्थितीत करण्यात आला, यावेळी बोलताना आमदार गोरखे बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, नाटककार राहूल सोलापूरकर हे प्रमुख व्याख्याते म्हणून तसेच जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य भगवान शिंदे, मारुती भापकर, माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे, आशा धायगुडे शेंडगे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप यांच्यासह जेजुरी संस्थांनचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, सुनिल भिसे, बापू घोलप, नाना कसबे, संजय ससाणे, अरूण जोगदंड, डॉ. धनंजय भिसे, सतीश भवाळ, संदीप जाधव, गणेश साठे, मयूर गायकवाड, भीमराव बरकडे, शिवाजी साळवे, डी.पी.खंडाळे, नाना कांबळे, आबा मांडरे, रामदास कांबळे, रामेश्वर बावणे, विठ्ठल कळसे, आशा शहाणे, सविता आव्हाड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभितेने राहूल सोलापूरकर यांनी सांगितले, आण्णा भाऊ साठे यांनी लिहीलेल्या फकिरा या कादंबरीला १९६१ साली साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला. ग्रामीण जीवनावरची कुठलाही दोष नसलेली कांदबरी मी वाचली आणि डोळ्यात अश्रू उभे राहिले असे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि. स. खांडेकर म्हणाले होते. कारण प्रत्यक्ष घडलेली कथा फकिरा या कादंबरीच्या माध्यमातून आण्णा भाऊ साठे यांनी लोकांसमोर मांडली होती. वर्तमानपत्रातही आण्णा भाऊ साठे स्तंभलेखन करायचे हे खुप कमी लोकांना माहिती आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन झाल्यानंतर साठेंनी त्यांच्यावर लेख लिहीला होता. हा लेख प्रत्येकाने वाचावा कारण एका साहित्यिकाने दुसऱ्या साहित्यिकाला दिलेली ही शब्दांजली आहे. आण्णा भाऊ साठे यांच्या लेखनीत देशाचे स्वातंत्र्य, महिलांचे शील जपणे तसेच पुरूषार्थ आणि स्वाभिमान ही तीन मुल्ये दिसतात जी शिरोधार्य मानून समाजाने पुढे जायला पाहिजे. आपल्या रोजच्या जगण्यातले अनुभव घेवून लिखाण करणे सोपे जरी वाटत असले तरी ते सोपे नाही. आण्णा भाऊ साठे यांचे हेच विचार पुढच्या पिढीने अंगीकृत करून जीवन जगले पाहिजे, असे मतही सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
या प्रबोधनपर्वामध्ये व्याख्याने, पोवाडे, लोककला, परिसंवाद, ऑर्केस्ट्रा, रोजगार मार्गदर्शन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच या पाचदिवसीय कार्यक्रमात महाराष्ट्रातील आणि स्थानिक कलाकारांनी कलेच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा, विचारांचा जागर केला.
प्रबोधन पर्वाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ३ ऑगस्ट रोजी मराठमोळे गाणे सादर करत मिठू पवार यांनी वातावरण संगीतमय केले, यानंतर प्रबोधनात्मक गीतांचा जंगी कार्यक्रम लखन अडागळे यांनी सादर करत नागरिकांचे मने जिंकली. त्यानंतर दुपारी १२ वाजता “मी होणार सुपरस्टार फेम” ज्ञानेश्वरी कांबळे आणि निलेश देवकुळे यांनी प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. दुपारच्या सत्रात समाजातील युवक व युवतींची राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात सचिन अडागळे, भूषण ओझर्ड, संतोष कसबे, डॉ. पांडुरंग साबळे, प्रा. प्रदीप कदम सहभागी झाले होते. सायंकाळी ५ वाजता “स्नेह शितल इव्हेंटस” हा कार्यक्रम शितल चव्हाण यांनी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. त्यानंतर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. हे नाटक राजपाल वंजारी यांनी सादर केले.
या नाटकाच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याला, विचारांना तसेच त्यांच्या कामगार चळवळ आणि जीवनातील काही प्रसंगांना उजाळा देण्यात आला. त्यानंतर रात्री ८ वाजता ऑर्केस्टा वर्ल्ड म्युझिक या कार्यक्रमाने प्रबोधनपर्वाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता झाली.
रविवार, ४ ऑगस्ट रोजी प्रबोधनपर्वाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात वाद्यवृंदासह गीत गायनाच्या कार्यक्रमाने झाली. हा कार्यक्रम अमर पुणेकर यांनी सादर केला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सांगीतिक अविष्कार, क्रांतीचा एल्गार हा कार्यक्रम शाहीर विकास येडके यांनी सादर केला. आपल्या शाहिरी आवाजाने विकास येडके यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर स्वर्ण लहरी हा कार्यक्रम अनिकेत जवळेकर यांनी सादर केला. तर दुपारच्या सत्रात के.डी. कड प्रस्तुत ऑल इन वन मनोरंजनाचा खेळ रंगला महिलांचा या कार्यक्रमास महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दर्शवला. त्यानंतर दुपारी ३ वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. समाजाला अ,ब,क,ड च्या आरक्षणाची गरज व वर्गीकरणाची आवश्यकता (अटी) या विषयावर अविनाश बागवे, भगवानराव वैराट, खंडदेव कटारे, अंबादास सगर यांनी आपआपले विचार मांडले. सायंकाळी राहुल शिंदे यांनी अण्णा भाऊंची गीते हा कार्यक्रम सादर करून गीतांच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर केला. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा सूर पल्लवी इव्हेंट्स आयोजित गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, योगेश शिरसाठ तसेच चला हवा येवू द्या फेम वैशाली शिदम यांनी हास्यकल्लोळ या प्रकारात २ नाटकाचे प्रयोग सादर केले आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले. यावेळी प्रेक्षकांनी या कलाकारांना भरभरून दाद दिली. रात्री जयेंदू मातोश्री प्रॉडक्शन प्रस्तुत थोरवी अण्णाची या लोक गीतांच्या कार्यक्रमाने चौथ्या दिवसाची सांगता झाली.
प्रबोधनपर्वाच्या शेवटच्या दिवसाची सुरूवात आनंद सृष्टी या प्रबोधनपर गीतांच्या कार्यक्रमाने झाली. हा कार्यक्रम नंदकुमार नेटके आणि अभिजीत राजे यांनी सादर केला. त्यानंतर गीते अण्णा भाऊंची हा कार्यक्रम महेंद्र बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले. तर ११.३० वाजता असा आमचा साहित्य सम्राट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चित्रसेन भवार यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. दुपारच्या सत्रात स्वरगंध प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर बाळासाहेब निकाळजे यांनी “आठवण अण्णांची हा गीतगायनाचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. हा कार्यक्रम करतील. दुपारी क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व मातंग समाजाचा गौरवशाली इतिहास या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जालिंदर कांबळे, दादा महाराज पाटोळे, वर्षा डहाळे यांनी सहभाग घेतला होता. सायंकाळच्या सत्रात प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये स्वाती महाडिक आणि सहकाऱ्यांचा समावेश होता. संध्याकाळच्या सत्रात साहित्याचा कोहिनूर हिरा – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधनात्मक गीते, लोककला, लोकगीते, मुजरे हा विविध पंचरत्न कार्यक्रम एस.के. प्रोडक्शन यांनी प्रस्तुत केला. दरम्यान, भगवान शिरसाठ आणि ज्युनिअर मोहम्मद रफी यांनीही यावेळी प्रबोधनपर गीते सादर केली.
पाच दिवसीय कार्यक्रमांचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच भानुदास साळवे, बाळासाहेब रसाळ, अरूण जोगदंड यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाबद्दल आमदार अमित गोरखे तसेच सुप्रसिद्ध अभिनेते राहूल सोलापूरकर यांच्या हस्ते जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याव्यतिरिक्त, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने यावर्षात १०४ रोपट्यांचे वृक्षारोपणचा संकल्प करण्यात आला तर १०४ ग्रंथांच्या ग्रंथदिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये १०४ वारकरी सहभागी झाले होते. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर तसेच नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी कक्षाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.
या पाच दिवसीय प्रबोधनपर्वाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य
लिपीक वसिम कुरेशी, लिपीक अभिजीत डोळस तसेच शिपाई चेतन मराडे, अक्षय किरवे, प्रफुल्ल कांबळे, ओंकार पवार तसेच पियुष घसिंग, श्रेयश जाधव, ओंकार जाधव या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.