महावितरणच्या नियमांचा बागुलबुवा, ठेकेदार हैराण आंदोलनाचा इशारा : वेळ व पैशाचा अपव्य होतअसल्याची तक्रार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयाच्या नियमांमुळे विद्युत ठेकेदार कमालीचे हैराण झाले आहेत. वस्तुस्थितीला धरुन नसलेल्या नियमांना तातडीने स्थगिती द्यावी; अन्यथा याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांना देण्यात आले असून सात दिवसांत सुधारणा करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
महावितरणकडून ग्राहकांच्या नवीन पायाभूत सुविधा उभारणी कामाची ठराविक पद्धत असून राज्यभरात त्यानुसार कामकाज चालते. त्यानुसार सर्व नवीन कामांच्या पूर्तता अहवालांना स्वीकारून नवीन वीज जोडण्या कार्यान्वित करण्याची प्रक्रिया निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्य पूर्तता अहवालांना विभागीय व मंडल
स्तरावर स्वीकृती देऊन जोडण्या जारी करण्याचे अधिकार आहेत. गेले तीन वर्षे त्यात पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयाने बदल करून पंचवीस लाखांच्या पुढील कामांच्या पूर्तता अहवालांना आपल्याकडे सादर करण्याचे आदेश मंडल व विभागीय कार्यालयांना जारी केले आहेत.
दरम्यान, या नव्या नियमांमुळे नवीन वीज जोडणी कामांना विलंब होत असल्याच्या अनेक ठेकेदारांनी तक्रारी केल्या होत्या. राज्यभरात वीज कंपनीसाठी एकच नियम असताना पुण्यातील प्रादेशिक कार्यालय कुठल्या आधारे नवीन नियमांचा पायंडा पाडत आहे? असा प्रश्न असोसिएशनने उपस्थित केला आहेत. तसेच प्रभारी म्हणून कार्यभार असलेल्या प्रादेशिक संचालकांकडून पदाचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. गेली चार वर्षे महावितरणने या पदावर प्रभारी अधिकार्याची मागील चार वर्षांपासून नेमणूक केली आहे,
असा आरोप असोसिएशनने केला आहे. अशा मनमानी कारभाराला लगाम लावावा अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा असोसिएशनने दिला आहे.
यावेळी अध्यक्ष गिरीश बक्षी, कार्याध्यक्ष संतोष सौंदनकर, उपाध्यक्ष मनोज हरपळे, सचिव नितीन बोंडे, मनोज सचदेव, सूरज भराटे, प्रदीप पाटील, मनेश शेळके, दिलीप कदम, संजय मोरे, तुषार फलके, श्रीकांत खरवडे आदी उपस्थित होते.