घाटकोपर येथील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शत्रुघ्न काटे यांचे पालिका आयुक्तांना लेखी निवेदन


दुर्घटना घडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच कडक व सक्तीचे पाऊल उचला-शत्रुघ्न काटे



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – घाटकोपर येथील घटनेचं पुनरावृत्ती टाळण्यासाठी शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना लेखी निवेदन दिले आहे.

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत नागरिकांच्या जीवांचा बळी गेल्याची घटनेची पुनरावृत्ती आपल्या पिंपरी चिंचवड शहरात होऊ नये म्हणून सदर महत्वपूर्ण प्रश्नाकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मुंबईत सोमवारी आलेल्या वादळात घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत निष्पाप जीवांचा बळी गेल्याचे वृत्त आज सर्वत्र पसरले आहे. शहरात असंख्य असे होर्डिंग उभे करण्यात आलेले आहेत आणि अशी दुर्दैवी वेळ पिंपरी चिंचवड शहरवासियांवर येऊ नये याबाबत प्रशासन काय पाऊल उचलत आहे यावर प्रत्येक नागरिक लक्ष्य ठेवून आहेत. शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी म्हणजे जेथे नागरी वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे अश्या ठिकाणी उभे असलेल्या या होर्डिंगला प्रत्येक नागरिक कर्दनकाळच्या नजरेने बघत असून होर्डिंग असलेल्या परिसर म्हणजे मृत्युचा सापळा समजत असून आपल्या मायबाप जनतेला सार्वजनिक ठिकाणी वावरणे असुरक्षित वाटत आहे.
शहरातील हे होर्डिंग किती भक्कम किंवा सुरक्षित आहे याचे परीक्षण पालिका प्रशासनाने केले आहे का?चौका-चौका मध्ये उभे असलेले होर्डिंग हे पालिकेच्या आदर्श नियमावलीमध्ये प्रमाणे उभे करण्यात आले आहे का ? याचे सर्वे पालिकेमार्फत केले गेले पाहिजे. चौकामध्ये किती आणि कोणत्या मोजमापाचे होर्डिंग उभे केले पाहिजे याची नियमावली सदर लाभधारक होर्डिंग कंपन्यांनी पाळले आहे का? लाभधारक होर्डिंग धारकांनी परवानगी घेतांना त्यांच्याद्वारे दिलेली माहिती आणि होर्डिंग उभे केल्यानंतरची परिस्थितीचा आढावा पालिकेमार्फत घेतले जाते का? चौकापासून किती अंतरावर होर्डिंग उभे केले पाहिजे? अनाधिकृत होर्डिंग वर काय कारवाई करणार ? या सर्व प्रश्नांनी आणि या होर्डिंगमुळे शहारचे विद्रूपीकरण झाले आहे.
BRTS प्रकल्प राबवलेल्या बस स्थानकावरील इलेक्ट्रिक जाहिरात होर्डिंग सुद्धा सुरक्षित आहेत का? बरेच नागरिक आज BRTS बस सुविधेचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत आणि या वर्दळीच्या ठिकाणीच बस स्थानकावर मोठ मोठे होर्डिंग बसविण्यात आले आहेत. पालिकेला महसुल उत्पन्न देणारा हा एक घटक असल्याचे माहीत आहे परंतु नागरिकांच्या जीवाशी खेळ करून मिळवलेली भरभराटीचा काय उपयोग.BRTS बस स्टॉप वर उभे करण्यात आलेले हे जाहिरात होर्डिंग धातुपासून बनविलेले असतात आणि म्हणून ते वजनाने खूप जड असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यावरील LED डिस्प्ले असलेले जाहिरात फलकला होणार्या विद्युत पुरवठामुळे काही दिवसांपूर्वीच एक कामगाराला यांच्या केबलमुळे विजेचा धक्का बसलेला आहे.
काही दिवसात राज्यात मान्सूनचे पुनरागमन होईल आणि तीन ते चार महीने पाऊस,सुसाट वारा,वादळे यांची खेळ सुरू होतील.निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही.अश्या परिस्थित जनमाणूस या अपघातांच्या भयपोटी मोकळ्या मनाने,सुरक्षितपणे वावरू शकतो याची हमी पालिका प्रशासन देऊ शकेत का? जर उत्तर हो असेल तर तुमच्या कामातून याची प्रचिती देत या जीवघेणे होर्डिंगवर कारवाई करीत उपाययोजना करा.
एक सुजान जनसेवक या नात्याने या पत्राद्वारे मी पालिका प्रशासनाला काही मोठी दुर्घटना घडून दुर्देवी काळ आपल्यावर ओढवू नये म्हणून सावध करीत आहे. दुर्घटना घडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच कडक व सक्तीचे पाऊल उचलणे गरजेचे आहे.
भविष्यात मुंबई येथील घाटकोपर याठिकाणी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत जो हाहाकार माजला त्याची पुनरावृत्ती जर पिंपरी चिंचवड शहरात झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालिका प्रशासनाची असेल हे लक्षात घ्यावे.यावेळी पालिका आयुक्त शेखर सिंह यांनीही या पत्राच्या माध्यमातून केलेल्या मागणीची गंभीरता लक्ष्यात घेत या विषयी आवश्यक ते कठोर पाऊल उचलू असे आश्वासन दिले आहे .








