मनसे ‘आपला माणूस’ म्हणून खासदार बारणे यांचे काम करणार – रणजीत शिरोळे
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मावळ लोकसभा मतदारसंघात ‘आपला माणूस’ म्हणून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचे काम करतील व त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणतील, अशी ग्वाही मनसेचे सरचिटणीस रणजीत शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी काळभोर नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पिंपरी- चिंचवड मधील मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस खासदार बारणे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला अध्यक्ष सीमा बेलापूरकर तसेच हेमंत डांगे, प्रीती सिंह परदेशी, राजू भालेराव, अनिकेत प्रभू, राजू सावळे, अंकुश तापकीर, सागर लांघे, नितीन चव्हाण, अनिता पांचाळ, आकाश सागरे, अलेक्स झांजर, दत्ता देवतरासे, मयूर चिंचवडे, विशाल मानकरी, बाळा दानवले, नितीन सूर्यवंशी, राज अवसरे, कृष्णा बी रुणगीकर, काशिनाथ खजूरकर, चंद्रकांत दोडमणी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाच्या प्रगतीची घोडदौड यापुढेही सुरू राहण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पुणे गरजेचे आहे. त्यामुळेच राज साहेबांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज साहेबांच्या आदेशानुसार आपल्याला देशाच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार व्हायचे आहे. त्यासाठी एकजुटीने, एकदिलाने ‘आपला माणूस’ आप्पा बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी महाराष्ट्र सैनिक जीवाची बाजी लावतील, असे शिरोळे म्हणाले.
खासदार बारणे म्हणाले की, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन संघटना प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसांसाठी काम करतात. स्वतःचा एकही उमेदवार न देता, केवळ देशहितासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने राज साहेबांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. मनसेचे आपल्याला नेहमी सहकार्य व पाठिंबा मिळालेला आहे. निवडणुकीनंतरही आपण या सहकार्याची जाणीव ठेवू.
मनसेच्या वतीने शिरोळे यांनी खासदार बारणे यांचा सत्कार केला व त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. विशाल मानकरी यांनी सूत्रसंचालन केले तर अनिकेत प्रभू यांनी आभार मानले.