रा.स्व.संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
दि.१४ रोजी सकाळी ७.३० वाजता पिंपरी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघ कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.जिल्हा संघचालक विनोद बन्सल, जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे, सामाजिक समरसता गतिविधीचे विलास लांडगे, प्रदीप पाटील यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व स्वयंसेवक उपस्थित होते.
समरसता गतिविधीतर्फे पाणपोई, व्याख्यान,वही पेन संकलन उपक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी रा.स्व. संघाच्या समरसता विभागाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम, व्याख्यान, वही पेन संकलन आदी उपक्रमांच्या आयोजनासोबतच पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळास्थानी अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता सामाजिक समरसता गतिविधी व स्व.तात्या बापट स्मृती समिती यांचे वतीने पाणपोईची सोय देखील करण्यात येत असते. कोरोना प्रादुर्भावाचा अपवाद वगळता गेल्या ३० वर्षांपासून ही अविरत सेवा सुरू असल्याचे समरसता गतिविधीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पाणपोईचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, सांगवी गट संघचालक लक्ष्मण पवार यांचे हस्ते झाले, अभिवादन स्थळी येणारे नागरिक या पाणपोईचा लाभ घेत आहेत. समरसता गतिविधी तर्फे ग्रामीण भागातील वंचित मुलांसाठी ‘ एक वही एक पेन ‘ अभियानातंर्गत संकलित ११०० वही पेन भारतीय बौद्धजन विकास समितीला सुपूर्द करण्यात आले यावेळी देहू गट संघचालक नरेश गुप्ता, समितीचे विजय कांबळे, प्रदीप पवार, सुनील आगळे यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते.
पिंपळे सौदागर भागात रमेश जाधव यांचे ‘ डॉ.बाबासाहेबांचे राष्ट्रीय विचार ‘ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन तर देहूरोड, पिंपळे सौदागर, पुनावळे, चिखली, निगडी भागात देखील अभिवादन कार्यक्रम झाले.