निगडी ते किवळे पुलावर गतीरोधक बसवा – अमित गावडे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- निगडी ते किवळे पुलावर अप्पुघरकडे जाणा-या जंक्शन येथे गतीरोधक बसविण्याची मागणी माजी स्थानिक नगरसेवक अमित गावडे यांनी महापालकेकडे केली आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांन निवेदन दिले आहे. त्यात गावडे यांनी म्हटले आहे की, दळणवळण सुकर व्हावे यादृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती, व्हाया रावेत ते किवळे या मार्गावर पुल उभारण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दळणवळणाची चांगली सोय झाली आहे. परंतु, काही त्रुटी आहेत. त्याची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे.
या पुलावरुन निगडीकडून किवळेच्या दिशेने जाताना उजव्या आणि किवळेवरुन निगडीच्या दिशेने येताना डाव्या बाजूला धोकादायक वळण आहे. वेगात वाहने आल्यास या वळणावरुन पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत वेगात आलेले वाहन कंट्रोल करताना अडचणी येताना दिसतात. एखादा मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे तत्काळ दोन्ही बाजूला मोठे गतिरोधक बसवावेत. जेणेकरुन वाहनांचा वेग कमी होईल. अपघाताचीही भिती राहणार नाही. अप्पुघर, दुर्गाटेकडीकडे जाणा-या जंक्शनवर सातत्याने अपघात होत आहेत. दुर्गाटेकडी फिरण्यासाठी सकाळी हजारो लोक जातात. जंक्शनवरुन जाणे धोकादायक झाले आहे. या चौकात मागील पंधरा दिवसांपूर्वी फिरण्यासाठी जाणा-या एका महिलेला दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिली. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. सुरक्षा रक्षक नेमावेत. अन्यथा भविष्यात अशी दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही गावडे यांनी म्हटले आहे.