पिंपरी चिंचवडचा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चेन्नईच्या संघाने ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवले आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या आगामी हंगामात सीएसकेचा कर्णधार नसणार आहे.
सलामीवीर ऋतुराज गायकवाड प्रथमच आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या भूमिकेत असेल. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आयपीएलचे पाच किताब जिंकले आहेत. मागील हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला नमवून धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची किमया साधली.
सीएसकेकडून सोशल मीडियावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. चेपॉकवर चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्याआधी धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला, संघाची धुरा युवा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आली आहे.