ताज्या घडामोडीपिंपरी
उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी अशी घ्या खबरदारी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून “उष्माघात” संबंधी शहरवासीयांनी घ्यावयाची दक्षता आणि उपाययोजना याबाबत आवाहन करण्यात आले.
महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी यासंदर्भात आव्हान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. सध्या हवामानातील बदल झालेला असून शहराचे तापमान खूप वाढत आहे. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याची शक्यता असल्याने शहरवासीयांनी उष्माघातासारख्या जीवघेण्या परिस्थितीतून वाचण्यासाठी दक्षता घ्यावी.
उष्माघात होण्याची कारणे :
उन्हाळ्यात शारिरिक श्रम, मेहनतीचे, व मजुरीची कामे फार वेळ करणे. कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे. जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे. अशा प्रत्येक उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
लक्षणे :
मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरूत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धावस्था आदी.
अतिजोखीमेच्या व्यक्ती :
गर्भवती महिला, बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणारी व्यक्ती, वयस्कर, वृद्ध, ज्या व्यक्तींना बिपी , शुगर चे आजार, हृदयरोग, फुफुसाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, यकृताचे आजार, आजारी असणारे व्यक्ती.
प्रतिबंधात्मक उपाय :
वाढत्या तापमानात कष्टाची कामे टाळावीत, शक्य असल्यास थोडा वेळ सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात करावीत.
उष्णता शोषून घेणारे काळ्या / गडद रंगाचे, तंग कपड्यांचा वापर टाळावेत. सैल पांढरे अथवा फिकट रंगाचे सुती कपडे वापरावेत.
तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर प्रवासात जात असता पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, ( शक्य असल्यास ORS चे पाणी वापरावे) धुम्रपान, मद्यपान, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स टाळावेत.
पाणी भरपूर प्यावे, डीहायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी, इत्यादी प्यावे.
उन्हात बाहेर जाताना, गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा,छत्री, इ चा वापर करावा.
पार्क केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नये.
त्वचेवर घामोळे आल्यास क्रीम किंवा ऑइंट मेंट न वापरता पावडर वापरावे.
उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या मनपा आरोग्य केंद्र/ रुग्णालय अथवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क करावे.
उपचार :-
रुग्णाला सावलीत आणि थंड जागी हलवा.
हातपायाला गोळे आल्यास तेथील स्नायूला हलका मसाज द्या. थोडे थोडे पाणी प्यायला द्या. उलटी झाली तर पाणी देऊ नका.
रुग्णाला थंडजागी शक्यतो एसीमध्ये झोपवा, अंगावरील कपडे सैल करा, ओल्या, थंड फडक्याने अंग पुसत राहावे. थोडे थोडे पाणी पाजत रहा, उलटी होत असेल तर पाणी देऊ नका, दवाखान्यात हलवा.
रुग्णाला हवेशीर व थंड खोलीत हलवावे, त्वरित खोलीतील पंखे, कुलर्स, एसी सुरु करावे.
रुग्ण शुध्दीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे, चहा, कॉफी देऊ नये.
रुग्णाच्या काखेखाली आईसपॅक ठेवावे, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.
तरी संशयित उष्माघाताच्या रुग्णांवर वेळेवर उपाययोजना करणेसाठी जवळच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र/ रुग्णालय अथवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क करावे. उष्माघाताच्या रुग्णावर उपचाराकामी आवश्यक मनुष्यबळ व औषधोपचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे असे आवाहन डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.