छत्रपती शिवाजी महाराज उलगडणार ‘शिवतांडव’ या मराठी नाटकामधून -भाऊसाहेब भोईर यांच्या मोरया थिएटर्सची निर्मिती
-मोरया गोसावीच्या साक्षीने संहिता पूजन संपन्न
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आता मराठी रंगभूमीवर उलगडणार आहे. ‘शिवतांडव’ असे या मराठी नाटकाचे नाव असून अभिनेते शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. या नाटकाचा संहिता पूजन सोहळा आज चिंचवड मधील मोरया गोसावी मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी ‘शिवतांडव’ या नाटकाचे निर्माते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, दिग्दर्शक दिलीप भोसले, अभिनेते शंतनू मोघे, संगीतकार रोहित नागभिडे यांच्यासह नाटकातील अन्य कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.
नाटकाबद्दल माहिती देताना दिग्दर्शक दिलीप भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी आपण मुघलांच्या अधिपत्याखाली होतो. शिवाजी महाराज म्हंटले की नाटक, सिनेमातून एक विशिष्ट पद्धतीने दाखवले जातात मात्र आम्ही ‘शिवतांडव’ नाटकामधून शिवाजी महाराजांचे चौफेर व्यक्तिमत्व, त्यांचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकात ३७ कलाकार असून या नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्येष्ठ लेखक प्रताप गंगावणे यांनी नाटकाचे लेखन केले असून मागील सहा महिन्यांपासून आम्ही नाटकाची पूर्वतयारी करत आहोत.अडीचशेहून अधिक कलाकारांच्या ऑडिशन मधून कलाकारांची निवड करण्यात आली आहे. संगीतकार रोहित नागभिडे यांचे संगीत ‘शिवतांडव’ला लाभले आहे. नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे असून सूत्रधार राजु बंग,भैरवनाथ शेरखाने आहेत. भव्य नेपथ्य, उत्तम संगीत, काळजाचा ठाव घेणारी गाणी आणि दमदार संवाद यामधून हे नाटक रसिकांची मने जिंकण्यात यशस्वी होईल असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला.
नाटकाचे निर्माते भाऊसाहेब भोईर म्हणाले, चित्रपट, नाटकाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा मोरया थिएटर्स चा नेहमी प्रयत्न असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आजच्या पिढीला दाखवण्यासाठी आम्ही ‘शिवतांडव’ ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मोरया गोसावीच्या साक्षीने आज नाटकाच्या संहितेचे पूजन करण्यात आले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग येत्या २८ मार्च रोजी चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात होणार आहे. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगा आधीच राज्याच्या विविध भागातून प्रयोगासाठी विचारणा होत असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात सुद्धा सहा प्रयोग होणार आहेत असेही भोईर यांनी सांगितले.