शिरूरमधून आढळरावच महायुतीचे उमेदवार; कामाला लागण्याचे मिळाले आदेश, २०१९ मधील डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी
शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या तोडीस तोड उमेदवार मिळत नव्हता आणि महायुतीला ही जागा काही गमवायची नव्हती. पराभव झालेल्या दिवसांपासून आढळराव पाटील यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली होती. अखेर दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हेदेखील उपस्थित होते. त्यात महायुतीचे उमेदवार म्हणून कामाला लागण्याच्या सूचना आढळराव पाटील यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिरूरमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव पाटील हे आता स्पष्टच झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोध दर्शवला. खुद्द आढळराव पाटील यांनी खेडला निवासस्थानी जाऊन आमदार मोहिते पाटील यांची भेट घेतली. पण, विरोध कायम होता. अलीकडे ते थोडे शांत झाले आहेत. त्यातच आता बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेणार असल्याचे समजते. ही भेट नाराजी दूर करण्यासाठीच असल्याची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे.