अरे बाबा तुला आमदार कोणी केला… पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला
लोणावळा , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अरे बाबा तू आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आले होते, त्यावेळी पक्षाचा जुना अध्यक्ष कोण होता, तुझ्या फॉर्म व चिन्हासाठी नेत्यांची सही लागते ना, ती माझी आहे. ज्या पक्षाचे कार्यकर्ते तुला निवडून आणायसाठी राबले, घाम गाळला, त्याच पक्षाच्या व त्याच विचारांच्या कार्यकर्त्यांना आज तुम्ही दमदाटी करता, सभेला जाऊ नका सांगता, माझी विनंती आहे, एकदा दम दिला आता बस्स… पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला… मी त्या रस्त्याने जात नाही मात्र कोणी त्या मार्गाने जाण्याची परिस्थिती निर्माण केली तर सोडत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना नाव न घेता लोणावळ्यात सुनावले आहे.
लोणावळ्यात आज गुरुवारी (7 मार्च) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी लोणावळा राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील 333 जणांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. व्यासपीठावरून बोलताना माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी आमदार सुनिल शेळके हे दम देतात असे म्हंटले होते तर आजच्या सभेला देखील जाऊ नका म्हणून त्यांनी काही जणांना फोन केला असे सांगितले. तसेच शरद पवार यांच्या नावाने कार्यक्रम घेतले म्हणून लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विनोद होगले याला कोणतीही कल्पना न देता पदावरून बाजूला केले असे सांगितले. त्यावरून शरद पवार यांनी आमदार सुनिल शेळके यांची कानउघडणी केली आहे.
तब्बल पाच वर्षानंतर शरद पवार लोणावळ्यात आल्याने, त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. गवळीवाडा येथील कुमार चौकात त्यांना भव्य हार घालण्यात आला तसेच तीन जेसीबी मशिनवरून फुलांची उधळण करण्यात आली. लोणावळा युवक अध्यक्ष बदलावरून अजित पवार गटात थिनगी पडली. व त्यावेळी 137 कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी राजीनामे दिले त्यात वाढ होऊन आज तब्बल 333 कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. या संवाद मेळाव्याला लोणावळ्यासह लोणावळा ग्रामीण, पवन मावळ, आंदर मावळ, तळेगाव, वडगाव, देहूरोड भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी देखील मेळाव्यात येऊन शरद पवार यांचा सन्मान केला.
या संवाद मेळाव्याला, माजी राज्यमंत्री मदनशेठ बाफना, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, माजी महापौर संजोग वाघिरे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, ज्येष्ठ नेते रमेश नय्यर, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, पै. चंद्रकांत सातकर, कुमार धायगुडे, नंदकुमार वाळूंज, नासीर शेख, यशवंत उर्फ बाळासाहेब पायगुडे, विनोद होगले, अतुल राऊत, सुरेश चौधरी, दत्तात्रय गोसावी, फिरोज शेख, सुधीर कदम, विशाल वहिले, श्वेता वर्तक, आशिष ठोंबरे, बाळासाहेब फाटक आदी उपस्थित होते.
भाजपा पक्ष बनलाय वाॅशिंग मशिन
वाॅशिंग मशिन मध्ये जशी मळलेली कपडे धुवायचे आता तसेच भाजपा पक्षात भ्रष्टाचारी धुतले जात आहे. प्रथम आरोप करायचे व नंतर ज्यांच्यावर आरोप झाले असतील त्यांना पक्षात घ्यायचे व स्वच्छ करायचे असा प्रकार सर्वत्र सुरू आहे. आदर्श घोटाळा याचा आरोप झाला व ज्यांच्यावर झाला ते अशोक चव्हाण 7 दिवसात भाजपावासी झाले, राज्य सहकारी बँक घोटाळा 70 हजार कोटीचा आहे असा आरोप झाला, व ज्यांच्यावर आरोप केला त्यांच्या सोबत युती केली.
जनतेच्या पैशातून जाहिरात करत म्हणतात मोदी की गॅरंटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या जाहिराती करत आहेत, त्या कोणाच्या पैशाने करत आहेत तर जनतेच्या पैशातून जाहिराती करत मोदी की गॅरंटी देत आहेत, ही कसली गॅरंटी असा हल्लाबोल पवार यांनी केला.
पवार म्हणाले, मी 10 वर्ष कृषिमंत्री असताना देश गहू, तांदूळ व साखर यामध्ये जगात अग्रेसर होता. आज दहा वर्षानंतर देशातील शेतकरी अडचणीत आला आहे.
छगन भुजबळ यांचे किस्से ऐकून ते घाबरले
छगन भुजबळ यांनी तुरुंगात काय काय त्रास होतो हे सांगितले असल्यामुळे भाजपाने ज्यांच्या ज्यांच्या घोटाळ्यांची यादी वाचली ते सर्व भाजपात पळाले अशा शब्दात माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी कोणाच्या नावाचा उल्लेख न करता हल्लाबोल केला. भाजपात आता एवढे भ्रष्टाचारी गेले आहेत की आप की बाद भाजपा तडीपार अशा घोषणा देण्याची वेळ आली असल्याचे बाफना म्हणाले.
लोणावळ्यातील यशवंत पायगुडे व मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी लोणावळा व मावळातील परिस्थिती पवार यांना सांगितली. संवाद मेळाव्याचे प्रास्ताविक फिरोज शेख यांनी केले तर यशवंत पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.