ताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक

“मुले घडली तर राष्ट्र घडेल!” – मयूर चंदने

Spread the love

 

*शिवशंभो व्याख्यानमाला – पुष्प दुसरे

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “मुले घडली तर राष्ट्र घडेल!” असे प्रतिपादन लोणावळा मनशक्ती केंद्रप्रमुख मयूर चंदने यांनी शिवमंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे बुधवार, दिनांक ०६ मार्च २०२४ रोजी केले. महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शिवशंभो फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवशंभो व्याख्यानमालेत ‘कोरोनानंतरचे मुलांचे भावविश्व’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना मयूर चंदने बोलत होते. उद्योजक संजय ढेंबरे, संजय जाधव, शांताराम शिंदे, शामराव मोरे, अशोक कदम, अनिल मुळे, गोरख शेलार, किशोर हरदास, शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे आणि अध्यक्ष संजय तोरखडे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

दृकश्राव्य माध्यमाच्या साहाय्याने अनौपचारिक शैलीतून श्रोत्यांशी सहजसंवाद साधत मयूर चंदने पुढे म्हणाले की, “कोरोनाचा फटका जागतिक पातळीवर सर्वांना बसला. विशेषतः या काळानंतर लहान मुलांचा स्क्रीन टाईम वाढला. त्यामुळे चंचलता, आक्रमकता, हिंसक वृत्ती वाढलेली आढळते. १९७० मध्ये ४ ते ५ वर्षांची मुले टीव्ही पाहत असत; पण १९२३ मध्ये जन्माला आल्यापासून स्क्रीन पाहणाऱ्या मुलांची संख्या खूप वाढली आहे. दर सात वर्षांनी मानवी मेंदूची स्थिती बदलते. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत मेंदूची ग्रहण आणि संस्कार क्षमता प्रचंड असते. त्यामुळे या वयात जे संस्कार मुलांवर होतात त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडते. टीव्हीवरील जाहिरातींचा कालावधी साधारणतः वीस सेकंदाचा असतो. त्यामध्ये अतिशय वेगाने गोष्टी घडलेल्या दाखवतात. या जाहिराती पाहिल्याने त्या मुलांना वास्तव जीवनातील गोष्टी खूप कंटाळवाण्या वाटतात. त्यातून त्यांना नैराश्य येते. परिणामी किशोरवयीन मुलांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यासाठी पालकांनी मुलांना जाणीवपूर्वक छंदांमध्ये रमवले पाहिजे. त्यांना मैदानी खेळांमध्ये गुंतवले पाहिजे. आपली शिक्षणपद्धती डाव्या मेंदूला प्रगत करणारी आहे; परंतु उजव्या मेंदूत भावनांचे केंद्र तसेच कल्पकता, नवनिर्मितीक्षमता असते. उजवा मेंदू प्रगत असलेल्या व्यक्तींनी जग बदलले, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे चित्रकला, संगीत अशा भावनिक विकास करणारे अन् उजव्या मेंदूला प्रगत करणारे छंद अथवा शिक्षण मुलांना जाणीवपूर्वक द्या!” असे आवाहन मयूर चंदने यांनी केले.

केशव घोळवे यांनी प्रास्ताविकातून, “स्पर्धेच्या युगात सातत्याने अद्ययावत राहणे सर्वांसाठी अत्यावश्यक आहे. मयूर चंदने यांनी मनशक्ती केंद्राच्या माध्यमातून शिवशंभो परिवाराला अनेकदा आपल्या ज्ञानाचा लाभ दिला आहे. आनंदी अन् समाधानी राहून ध्येय गाठण्यासाठी व्याख्यानमाला उपयुक्त ठरते!” असे मत व्यक्त केले. राजेश हजारे, दत्तात्रेय भुसे, विद्याधर राणे, संजय देशमुख, हनुमंत जाधव, कैलास पोखरकर, रूपाली तोरखडे, अरुणा घोळवे, रेणुका हजारे यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. सरिता बारवकर यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button