

पिंपरी-चिंचवड पथविक्रेता समितीची बैठक संपन्न; सर्व प्रभागांत जागांची पाहणी करून विक्रेत्यांना न्याय देणार
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी-चिंचवड शहरातील पथविक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध हॉकर झोन निर्माण करण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असून, शहरातील सर्व प्रभागांमध्ये योग्य जागांची पाहणी करून पथविक्रेत्यांना न्याय देण्यात येईल. तसेच पथविक्रेत्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्यात येईल, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समितीचे अध्यक्ष तथा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केले.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर २०२३ नंतर प्रथमच पथविक्रेता समितीची बैठक आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त सीताराम बहुरे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, समिती सदस्य किरण साडेकर, राजू बिराजदार, अलका रोकडे, सलीम डांगे, शंकर पवार उत्तम सकटे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि वाहतूक पोलीस प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी शहरातील पथविक्रेत्यांना सुसज्ज जागा आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहील, असे सांगितले. सर्व प्रभागांतील संभाव्य हॉकर झोनची पाहणी करून नियोजन करण्यात येईल. बोगस सर्वेक्षण व बोगस प्रमाणपत्रांच्या प्रकरणांवर कारवाई केली जाईल. उर्वरित पात्र विक्रेत्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान करण्यात येईल. तसेच पथविक्रेता समितीच्या बैठका नियमितपणे घेण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी काशिनाथ नखाते यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ३० हजार पथविक्रेत्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पथविक्रेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संघटनेने रस्त्यावरील आंदोलनासोबतच न्यायालयीन लढाही दिला. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी विक्रेत्यांना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता हॉकर झोन निर्मितीसाठी आणखी पाच वर्षे घालवता कामा नयेत. पुढील चार महिन्यांत झोन निश्चित करून पात्र विक्रेत्यांना ओळखपत्रांसह कायमस्वरूपी व्यवसायाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. पथविक्रेत्यांबाबत संकुचित दृष्टिकोनातून कारवाईची मागणी होत असली, तरी महापालिका प्रशासनाने पथविक्रेता कायद्यानुसारच काम करावे.
पिंपरी-चिंचवड हे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असताना शहरातील पथविक्रेत्यांनाही आधुनिक सुविधा, स्वच्छता, शिस्तबद्ध व्यवसाय व्यवस्था आणि नियोजनबद्ध जागा उपलब्ध करून देऊन ‘स्मार्ट हॉकर’ ही संकल्पना यशस्वी करता येऊ शकते. याबाबतचा प्रस्तावही काशिनाथ नखाते यांनी बैठकीत मांडला. यामुळे शहराचे सौंदर्य, वाहतूक व्यवस्था आणि पथविक्रेत्यांचा रोजगार यांचा समतोल साधता येईल, असे त्यांनी नमूद केले. प्रामाणिक विक्रेत्यांना संरक्षण देण्यात यावे तसेच, प्रत्यक्ष व्यवसाय न करता बोगस सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका नखाते यांनी मांडली.



















