

नाशिक, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संपूर्ण जग आज ‘एक पती, एक पत्नी’ या तत्त्वावर पुढे जात असताना महिलांना समान हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले असून, आयोगाच्या प्रक्रियेनंतर राज्यातही लवकरच समान नागरी कायदा लागू होईल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आलोक कुमार यांनी सोमवारी (दि. २३) नाशिक येथे व्यक्त केला.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आलोक कुमार यांच्या नाशिक दौऱ्यास महत्त्व आहे. या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, जिल्हाध्यक्ष राजेश दरगुडे, विभागमंत्री अनिल चांदवडकर, क्षेत्र संघटन मंत्री अनिरुद्ध पंडित, प्रा. संजय मुंदराळे, जिल्हा मंत्री योगेश बहाळकर आदी उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधताना आलोक कुमार यांनी समान नागरी कायद्याचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले, “हा कायदा मंजूर करून लागू करणे हा केवळ कायदेशीर बदल नसून तो लिंगसमानता आणि महिलांवरील अन्याय दूर करणारी क्रांती ठरावी. चार विवाह करणे किंवा पतीने कोणतेही कारण न देता तोंडी तलाक देऊन महिलेला वाऱ्यावर सोडणे, हे कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शोभणारे नाही. पतीच्या निधनानंतर पत्नीला त्याच्या मालमत्तेत सन्मानाने वाटा मिळालाच पाहिजे. उत्तराखंड, गुजरात आणि आसाम या राज्यांनंतर आता महाराष्ट्रही संविधानाच्या या निर्देशाचे पालन करत समान नागरी कायदा लागू करेल, अशी आम्हाला खात्री आहे”, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
राज्यात अवैध धर्मांतरणाचे मोठे आव्हान असल्याचे सांगत ते म्हणाले की, आमिष दाखवून, अंधश्रद्धेचा आधार घेत फसवणूक करून किंवा भीती दाखवून होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा स्वागतार्ह आहे. पुणे आणि नाशिकमध्ये या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होऊन आरोपींना ४० दिवस जामीन मिळाला नाही, यावरून कायद्याचा धाक निर्माण होत असल्याचे स्पष्ट होते. हा कायदा अधिक कठोरपणे राबवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अयोध्या, काशी आणि मथुरा या तिन्ही श्रद्धास्थानांच्या मुक्तीचा संकल्प संतांनी दिला होता. त्यातील श्रीराम जन्मभूमीचा लढा यशस्वी झाला असून, मथुरा आणि काशीची प्रकरणे सध्या न्यायालयात आहेत. तथ्य आणि तर्क आपल्या बाजूने असल्याने आगामी ८ ते १० वर्षांत हे दोन्ही संकल्पही कायदेशीर मार्गाने पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे देशभरात ‘हितचिंतक अभियान’ राबवून १ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
महत्त्वाचे :
– समान नागरी कायद्यामुळे महिलांना मालमत्तेत हक्क आणि विवाहाबाबत समान न्याय मिळेल.
– अवैध धर्मांतरण रोखणाऱ्या कायद्याची महाराष्ट्रात अधिक कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी.
– तथ्य आणि कायदा आपल्या बाजूने असल्याने मथुरा व काशीचा प्रश्न ८-१० वर्षांत सुटणार.
– अशोक सिंघल जन्मशताब्दी वर्षानिमित्त विहिंपचे देशभरात १ कोटी ‘हितचिंतक’ जोडण्याचे लक्ष्य.
– चक्रतीर्थ धर्मध्वजा कार्यक्रमातील उत्स्फूर्त सहभागातून जनजाती समाज हिंदूच असल्याचा संदेश.
– नाशिक व त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांच्या मार्गावरील मांस-मच्छी व मद्याची दुकाने हटवण्याची मागणी.
– कुंभमेळ्याची कामे ‘अर्धा पेला भरलेला’ :
नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर बोलताना आलोक कुमार यांनी सध्याच्या कामांचे वर्णन ‘अर्धा पेला भरलेला आणि अर्धा रिकामा’ असे केले. “रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू आहेत, मात्र त्यांना वेग देण्याची गरज आहे. अनेक संतांच्या आश्रमांचे सर्वेक्षण होऊन निधी मंजूर झाला असला तरी तो अद्याप मिळालेला नाही. कुंभमेळ्याला अवघे आठ महिने शिल्लक असल्याने सरकारने तातडीने निधी वितरित करावा. तसेच, चक्रतीर्थ परिसराचा विकास करून तीर्थक्षेत्रांच्या मार्गावरील मांस व मद्यविक्रीची दुकाने हटवावीत,” अशी मागणी त्यांनी केली. आगामी कुंभमेळ्यात विहिंपतर्फे ५ ऑगस्ट रोजी मार्गदर्शक मंडळाची बैठक, साध्वी संमेलन, १४ ऑगस्टला युवा संत संमेलन, कथा व्यास संमेलन आणि ५ ते १० हजार वारकरी कीर्तनकारांचे भव्य संमेलन आयोजित केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
– मंदिरे ही श्रद्धास्थाने, पर्यटनाची ठिकाणे नाहीत :
मंदिरे आणि धार्मिक स्थळांवरील प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना आलोक कुमार म्हणाले की, “हिंदू मंदिरे आणि आश्रम ही सहलीची किंवा पर्यटनाची ठिकाणे नसून ती कोट्यवधी भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. मक्का येथे केवळ मुस्लिमांनाच प्रवेश दिला जातो, तिथे इतरांना मज्जाव असल्याचे फलक लावलेले असतात, यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. त्याच धर्तीवर आमच्या मंदिरांचे आणि श्रद्धास्थानांचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. तमिळनाडूतील मदुराई येथील दीपस्तंभावर दिवा लावण्याच्या परंपरेला तेथील सरकारने विरोध केला, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती परंपरा कायम ठेवून हिंदूंच्या श्रद्धेचा सन्मान केला आहे.”



















