

बाई आणि नाना हे रंगभूमीवरील बिनीचे शिलेदार- प्रवीण भोळे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विजयाबाई आणि नाना पाटेकर यांनी आपापली वेगळी शैली रंगभूमीवर आणली. स्वातंत्र्योत्तर काळात दिवाणखान्याबाहेर नाटक आणत चौकटी तोडण्याचे काम विजयाबाईंनी केले. बाईंनी नाटकाच्या वेगळ्या शैलीला लोकप्रिय करत त्याला रंगभूमीचा भाग बनवले. नानांनी आपली अभिनयाची वेगळी शैली जपली त्यामुळे बाई आणि नाना हे रंगभूमीवरील बिनीचे शिलेदार आहेत असे वक्तव्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे यांनी केले. रंगानुभूति महोत्सवातील ‘रंगमंथन’ या चर्चासत्रात ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी, पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या वतीने २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोगकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव निगडीतील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात होत आहे. सोमवारी (२३ नोव्हेंबर) तिस-या दिवशी अभ्यासवर्ग आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. दिवंगत कलाकार नाना पाटेकर, विजया मेहता यांच्या रंगभूमीवर कार्याचा आढावा ‘रंगमंथन’ चर्चासत्रात घेतला.
नाट्य चित्रपट अभ्यासक समर नखाते म्हणाले, विजयाबाईंनी एक वेगळी रंगदृष्टी कलाकारांना देत कलाकारांची वेगळी फळी निर्माण केली. त्यांनी रंगभूमीचे दालन खुले करत चांगले कलाकार तयार केले त्यातील एक म्हणजे नाना पाटेकर. नाट्यप्रवाहातला प्रगतीशील गाभा पुढे नेणारे हे दोन कलाकार झाले. बाईंनी तयार केलेले कलाकार कोणत्याही कलाप्रकारात आघाडीवर राहिले. विजयाबाईंची शिस्त त्यांच्या नटांतही आली हे विशेष. शिस्त बाहेरुन लादलेली नाही तर कलाकार म्हणून उपजत असलेली आल्याने त्याचा कलाकार म्हणून त्यांना फायदा झाला. थिएटर वर्कश़ॉप कंपनीचे संचालक प्रभाकर पवार यांनी मान्यवरांशी संवाद साधला.
दुपारच्या दुस-या सत्रात ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित यांचे ‘अगा मी जगमय झालो’ हे नारायण सुर्वे यांच्या कवितांच्या कवितांचे दर्शन रसिकांना झाले. सुर्वे यांनी लिहीलेल्या
प्रेमकविता, द्विपदी, मुक्तछंद असे कवितांचे प्रकार पेश करत उत्कृष्ठ सादरीकरण केले. भावगर्भासह सादर केलेल्या कवितांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
तिस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात आसाममधील नाट्यप्रशिक्षक मदन राभा आणि निलोत्पल बरुआ यांनी आसामी रंगभूमीचा इतिहास उत्क्रांती याबाबत अभ्यासवर्ग घेतला. यामध्ये बडुनगडुप्पा आसामी रंगभूमीची उत्क्रांती आणि विमर्शाचा दिर्घ प्रवास याबाबत चर्चा केली. निसर्गात आणि कोणत्याही संसाधनाशिवाय सुरु असलेली नाट्यपरंपरा आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करुन नाट्य परंपरेचा प्रवास उलगडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ऋतुजा दिवेकर, अमृता ओंबळे यांनी मानले. थिएटर वर्कशॉप कंपनीच्या कलाकारांनी नियोजनात सहकार्य केले.



















