

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- रावेत परिसरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. फुटपाथवर तसेच रस्त्यालगत थाटण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, फळविक्रेते, हातगाड्या, उसाचे गुऱ्हाळ आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. या अतिक्रमणांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या महिला शहराध्यक्ष कविता कोंडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
रावेत येथील ज्ञानू होम ते डी. वाय. पाटील कॉलेज, धर्मराज चौक, गुरुद्वारा चौक तसेच विविध कॉलनी परिसरात अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. फुटपाथवरच व्यावसायिकांनी जागा व्यापल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे. परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून अपघातांचा धोकाही निर्माण झाला आहे.
विशेषतः शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थी, रुग्णालयात जाणारे नागरिक आणि रुग्णवाहिकांना या अतिक्रमणांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असतानाही अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल आम आदमी पार्टीने नाराजी व्यक्त केली आहे.
या संदर्भात आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने महापालिकेच्या ज क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, महिला शहराध्यक्ष कविता कोंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणाच्याही दबावाला बळी न पडता रावेतमधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील सर्व अनधिकृत अतिक्रमणांवर तातडीने कठोर कारवाई करावी. कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. तसेच केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रावेतमधील नागरिकांना मोकळे फुटपाथ, सुरक्षित रस्ते आणि वाहतूक कोंडीमुक्त परिसर मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने केवळ निवेदन स्वीकारून न थांबता प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी भूमिका आम आदमी पार्टीने मांडली आहे.



















