

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांना दिल्ली दूरदर्शन, प्रसार भारती (भारत सरकार) यांच्याकडून प्रतिष्ठेच्या ‘टॉप ग्रेड’ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कलाक्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा बहुमान प्रदान करण्यात आला आहे.
यापूर्वी डॉ. कपोते यांना दूरदर्शनची ‘ए ग्रेड’ प्राप्त झाली होती. आता त्यांना ‘टॉप ग्रेड’ मिळाल्याने त्यांच्या कलात्मक प्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण मानाचा तुरा रोवला गेला आहे. दूरदर्शनतर्फे शास्त्रीय कलाकारांना प्रदान करण्यात येणारा ‘टॉप ग्रेड’ हा देशातील सर्वोच्च सन्मान मानला जातो.
डॉ. नंदकिशोर कपोते हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथक नर्तक असून, महाराष्ट्रातील कथक क्षेत्रातील पीएच.डी. पदवी प्राप्त करणारे पहिले कलाकार आहेत. कथक नृत्यातील त्यांच्या सर्वांगीण योगदानाबद्दल त्यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथे केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
दूरदर्शनच्या ‘टॉप ग्रेड’ सन्मानामुळे डॉ. नंदकिशोर कपोते यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या या यशाबद्दल कला क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



















