

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड येथील पार्क स्ट्रीट सोसायटी परिसरातील नागरिकांच्या विविध गंभीर समस्यांवरून नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अनधिकृत बांधकामे, रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक आणि प्रशासनाच्या परवानग्यांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
पार्क स्ट्रीट सोसायटी परिसरात सुमारे १२ हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत परिसरातील आरएमसी प्लांटला परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
तसेच स्वतंत्र सोसायटी असलेल्या पार्क स्ट्रीटच्या कंपाउंड वॉलचा काही भाग पाडून नवीन बांधकाम सुरू असलेल्या सोसायटीसाठी रस्ता तयार करण्याचा अधिकार कोणाला दिला? यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
सोसायटीच्या मुख्य रस्त्यावरून डंपर, आरएमसी मिक्सर आणि बांधकाम साहित्य वाहून नेणारी अवजड वाहने सातत्याने ये-जा करीत आहेत. यामुळे शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या वाहनांमुळे अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, बिल्डर की महापालिका प्रशासन, असा सवाल स्नेहा कलाटे यांनी केला आहे.
या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांची भेट घेऊन नियमबाह्य कामांची चौकशी, अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण आणि संबंधित जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सुरक्षिततेसाठी आपण ठामपणे उभे असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी दिला आहे.
नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सुरक्षिततेसाठी आपण ठामपणे उभे असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्नेहा काळाटे यांनी दिला आहे.



















