
प्रारूप विकास आराखड्यातील रस्ते व आरक्षणांबाबत नगरसेविका अरुणा लंगोटे यांच्या हरकती; नागरिकांना दिलासा देण्याची मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ग. दि. माडगूळकर सभागृहात प्रारूप विकास आराखड्याबाबत हरकती व सूचना नोंदविण्यासाठी आयोजित सुनावणीत नगरसेविका सौ. अरुणा गणेश लंगोटे यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर हरकती नोंदविल्या.
कै. धोंडीबा दातीर पाटील मार्गावरील (संघवी कॉलेज ते परशुराम चौक) ३६ मीटरचा प्रस्तावित रस्ता प्रारूप विकास आराखड्यात पश्चिमेकडे सरकविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक बेघर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे रस्त्याच्या प्रस्तावित आखणीत बदल करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच मोहननगर येथील शिवदर्शन कॉलनीमध्ये बांधकाम मंजूर नकाशानुसार उभारण्यात आलेल्या इमारतींच्या भागात टाकलेले आरक्षण एमआयडीसी आरक्षणातून वगळण्याची मागणी केली. सर्व्हे क्रमांक १३५ येथे ५० वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या घरांवरील एमआयडीसी आरक्षण शासनाच्या नियमानुसार शुल्क आकारून रद्द करावे आणि त्यांची बांधकामे नियमित करावीत, अशी मागणीही त्यांनी मांडली.
याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (अलंकार कॉर्नर) ते तुळजाभवानी मंदिर रस्ता, तसेच बालाजी चौक आणि काळभोरनगर परिसरातील एमआयडीसीने वाटप केलेल्या भूखंडांवर प्रारूप विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या रस्त्यांबाबतही त्यांनी हरकत नोंदविली. या विविध मुद्द्यांवर सुनावणी समितीने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे नगरसेविका लंगोटे यांनी सांगितले.
नागरिकांचे घरांचे संरक्षण, मंजूर बांधकामांना न्याय आणि विकास आराखड्यातील त्रुटी दूर करण्यासाठी या हरकती महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.



















