
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी कचरा डेपो दुर्घटनेत जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना अखेर हक्काच्या घराचा आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दुर्घटनेतील आठ दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोशी येथील एसआरए (SRA) प्रकल्पांतर्गत आठ सदनिकांचे वाटप करण्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अधिकृत मान्यता दिली आहे.
भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी या आपत्तीग्रस्त कुटुंबीयांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, या निर्णयामुळे आठ कुटुंबांच्या आयुष्यात सुरक्षिततेचा आणि नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.
दि. ८ जुलै २०२६ रोजी झालेल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कुटुंबातील कर्ता माणूस गमावलेल्या वारसांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आपल्या माणसाच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नसली, तरी त्यांच्या पश्चात कुटुंबीयांना सन्मानाने जगण्यासाठी हक्काचा निवारा मिळावा, अशी मागणी होती.
या कुटुंबांच्या प्रश्नाकडे केवळ प्रशासकीय किंवा तांत्रिक बाब म्हणून न पाहता मानवी संवेदनशीलतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची भूमिका आमदार लांडगे यांनी घेतली. दुर्घटनेत जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून देणे ही केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर समस्त पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने आपली नैतिक जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत संबंधित आठ वारसांना यशवंतनगर, पिंपरी येथील एसआरए प्रकल्पातील सदनिकांचे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नऊ पैकी आठ कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला आहे. उर्वरित एका कर्मचाऱ्याच्या वारसांची कागदपत्रांची पूर्तता करणे बाकी आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील त्या वेदनादायी आठवणी आजही मन हेलावून टाकतात. शहरासाठी कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणे आणि त्यांना सुरक्षित निवारा मिळवून देणे, हे पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने आमचे सामाजिक उत्तरदायित्व होते. आज त्या उत्तरदायित्वाची पूर्तता होत असल्याचे समाधान आहे.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विधी समितीच्या सभापती सुजाता बोराटे, क-प्रभागाचे अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे, अ-प्रभागाच्या अध्यक्षा अर्चना सस्ते, नगरसेविका सौ. सारिका गायकवाड, नगरसेवक सचिन तापकीर, सामाजिक कार्यकर्ते राजेश सस्ते, नीलेश बोराटे, रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
दरम्यान, या संवेदनशील विषयात सकारात्मक भूमिका घेत निर्णयप्रक्रियेला सहकार्य करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आमदार लांडगे यांनी आभार मानले.
“गेलेला माणूस आपण परत आणू शकत नाही. त्या कुटुंबांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळीही कधी भरून निघणार नाही. मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या त्या कटू आठवणी आजही मनात जशाच्या तशा आहेत. मात्र, त्या संकटात सापडलेल्या कुटुंबांना एकटे पडू न देणे, त्यांच्या हक्कासाठी उभे राहणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आधार मिळवून देणे, हे समस्त पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने आमचे उत्तरदायित्व होते. ही आपल्या शहरासाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता आहे. नऊपैकी आठ कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला. एका कुटुंबाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर या शहराचा एक जबाबदार नागरिक म्हणून हे कर्तव्य पार पाडणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.



















