
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कथित लाचखोरी प्रकरण आणि बीट मार्शल संदर्भातील गैरव्यवहाराच्या तक्रारींवरून महापालिका प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्याविरोधातील लाचप्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच त्यांच्या कार्यकाळातील संशयास्पद फायली, निविदा आणि विकासकामांची स्वतंत्र तपासणी करावी, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात भोईर यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्याविरोधात लाचप्रकरणी कारवाई केल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे महापालिकेच्या प्रशासकीय पारदर्शकतेवर आणि प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे भोईर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या बीट मार्शल यंत्रणेबाबतही मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार, गैरवर्तणूक आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारींची निष्पक्ष चौकशी होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ओंबासे यांच्या कार्यकाळातील फायलींची तपासणी करा
मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्या कार्यकाळातील संशयास्पद फायली, निविदा प्रक्रिया आणि विविध विकासकामांची महापालिका स्तरावर उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भोईर यांनी केली आहे. तसेच बीट मार्शल संदर्भातील सर्व प्रलंबित तक्रारींची स्वतंत्रपणे चौकशी करून त्यातील गैरव्यवहार उघडकीस आणावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या दोन्ही प्रकरणांत चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी. त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी तातडीने ठोस पावले उचलावीत. अन्यथा जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी दिला आहे.



















