
छठपूजेसाठी सोयीसुविधा आणि पोलीस बंदोबस्त द्या
हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय गुप्ता यांची महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात १५ आणि १६ नोव्हेंबर २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या छठपूजेच्या पार्श्वभूमीवर नदीघाट परिसरात स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, अग्निशमन दल, स्टेज तसेच आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय आर. गुप्ता यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे कि, ”पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून विविध नदीघाटांवर छठपूजेचे आयोजन केले जाते. शहरात उत्तर भारतीय समाजाची मोठी लोकसंख्या वास्तव्यास असून, लाखो भाविक या धार्मिक उत्सवात सहभागी होतात. मात्र, घाट परिसरात आवश्यक सुविधा अपुऱ्या पडत असल्याने भाविकांची गैरसोय होत असल्याचे गुप्ता यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
पवना नदीकिनारी, बिर्ला हॉस्पिटल रोड येथील हॉटेल रिव्हर व्ह्यूजवळील गणपती विसर्जन घाट परिसरात छठपूजेचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेळी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. त्यामुळे संबंधित प्रभागांतील घाटांची स्वच्छता, पुरेशी प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, अग्निशमन दलाची तयारी आणि आवश्यक व्यासपीठाची व्यवस्था महापालिकेने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
छठपूजेदरम्यान नदीघाटांवर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक नियंत्रण, गर्दीचे व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी विनंतीही पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. सर्व घाटांवर समन्वयाने व्यवस्था केल्यास भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरणात पूजा करता येईल. छठपूजेसाठी आवश्यक नागरी सुविधा आणि पोलीस सुरक्षा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित विभागांना द्यावेत, अशी मागणी विजय गुप्ता यांनी या पत्रकात केली आहे.
छठपूजेचे वेळापत्रक :-
रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ : सायंकाळी ६.०४ वाजता सूर्यास्ताच्या वेळी संध्या अर्घ्य.
सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ : सकाळी ६.३३ वाजता सूर्योदयाच्या वेळी उषा अर्घ्य आणि पूजेची सांगता.



















