
चिचंवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये शारदोत्सव दिमाखात साजरा; दांडियाने धरला ठेका
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये नवरात्रौत्सवानिमित्त ‘शारदोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या संयोजनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शारदामातेच्या प्रतिमेचे पूजन आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले .
नवरात्रोत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने महाविद्यालयात आंतर-वर्गीय दांडिया नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. स्नेहा भाटिया आणि त्यांच्या टीमने या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले. विद्यार्थ्यांनी आकर्षक पारंपरिक वेशभूषा परिधान करून तालबद्ध दांडिया नृत्याचे सादरीकरण केले. ढोलच्या तालावर आणि पारंपरिक संगीतावर विद्यार्थ्यांनी धरलेल्या ठेक्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला.या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध परीक्षक रौनक गांधी यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढील
सांघिक गटात – प्रथम क्रमांक अकरावी वाणिज्य – ब , द्वितीय क्रमांक – अकरावी वाणिज्य – ड,
तृतीय क्रमांक अकरावी विज्ञान – इ
युगुल गटात -प्रथम क्रमांक -कु. प्राजक्ता तावडे आणि कु. सृष्टी शिंदे (बारावी वाणिज्य) द्वितीय क्रमांक – कु. अंजली गुरुंग आणि कु. पूर्णा काशीलकर.
विजेत्या संघांना आणि युगुल विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
या उत्सवाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व समजावून सांगणे तसेच शिक्षणाबरोबर त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे हा होता. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव, सांघिक भावना, आत्मविश्वास आणि कलात्मक अभिव्यक्ती विकसित होण्यास मदत होते, असे मत प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे संस्थापक , सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालक डॉ. तेजल शहा यांच्या प्रोत्साहन आणि मार्गदर्शनामुळे हा शारदोत्सव आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शारदामातेच्या आशीर्वादाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानप्राप्तीचा आणि यशाचा मार्ग अधिक उज्ज्वल होवो, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.



















