
आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहर महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी कविता कोंडे देशमुख यांची निवड; चिंचवड व भोसरी विधानसभा महिला अध्यक्षांचीही घोषणा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -आम आदमी पार्टी (आप) महाराष्ट्रच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून, महिला आघाडीच्या महत्त्वाच्या पदांवर नवनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
या कार्यकारिणी विस्तारात आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहर महिला शहराध्यक्षपदी कविता कोंडे देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
तसेच विधानसभानिहाय महिला नेतृत्वाची जबाबदारी सोपवताना:
चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षपदी: शिल्पा फुलमाळी
भोसरी विधानसभा महिला अध्यक्षपदी: सुनंदा दुधाळ
यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्व नियुक्त्या २३ ऑक्टोबर २०२६ रोजी आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश समितीकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या. सदर नियुक्तीपत्रावर आप महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रकाशजी जरवाल, प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे, प्रदेश संघटक ॲड. सागर पाटील आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाठ यांच्या संयुक्त स्वाक्षऱ्या आहेत.
महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणार – शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाठ
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाठ म्हणाले, “या अभ्यासू व कार्यक्षम महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात आम आदमी पार्टीची महिला आघाडी अधिक मजबूत होईल. शहरातील महिलांचे विविध प्रश्न, नागरी समस्या आणि हक्क प्रभावीपणे मांडले जातील, तसेच पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यास मोठी मदत होईल.”
आम आदमी पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस उदंड शुभेच्छा दिल्या आहेत.



















