
’महायुतीच्या एकत्रित ताकदीमुळे स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित’
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास आकुर्डीतील महायुतीचा मेळाव्यात विजयाचा संकल्प
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या महायुतीतील पक्षांची पिंपरी-चिंचवड शहरात मोठी ताकद आहे. सर्व मित्र पक्षांत अनुभवी नेते आहेत. महायुतीच्या एकत्रित ताकदीमुळे डॉ. स्मिता योगेश जाधव आणि कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी (दि.19) व्यक्त केला. महायुतीच्या या मेळाव्यात दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा संकल्प करण्यात आला.
पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव, शिक्षक मतदार संघाचे कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात महायुतीचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर यावेळी महापौर रवी लांडगे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, विलास लांडे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) शहरप्रमुख नीलेश तरस, भारतीय रिपब्लिकन पाटी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, भाजपचे शहर प्रभारी भरत पाटील, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, अजित गव्हाणे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, संघठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, माजी महापौर संजोग वाघेरे, राहुल जाधव, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, विकास डोळस, मधुकर बच्चे, अनुप मोरे, अॅड. गोरक्ष लोखंडे, राहुल कलाटे, वैशाली खाडये, संजय पटणी, सुजाता पालंडे, दिनेश यादव, धनराज बिरदा यांसह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) या मित्रपक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी येत्या शुक्रवारी मतदान होत आहे. शहरातील पदवीधर मतदार संघात एकूण 7 हजार 281 आणि शिक्षक मतदारसंघात 2 हजार 94 मतदार आहेत. महायुतीचे सर्वच नेते उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. सुमारे नऊ हजार मतदारांसाठी महायुतीची ताकद पणाला लागली आहे. शहरात अनेक अनुभवी राजकारणी आहेत. त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे. मागील 25 वर्षापासून पुणे विभाग हा भाजपचा परंपरागत मतदार संघ आहे. यंदाही तो मतदार संघ आपल्याकडे कायम राहणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या मागे मोठी ताकद आहे. त्यांची स्वत:ची अशी वेगळी स्वतंत्र ओळख आहे. महिला, सामाजिक, शिक्षण आदी क्षेत्रात त्यांचे कागगिरी उत्तुंग आहे. शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा पश्चिम महाराष्य्रात चांगला जनसंपर्क आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारत देशात विद्यापीठ, आयआयटी तसेच, इतर मोठ्या शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली. शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल झाले आहेत. देश सुरक्षित असून, तो खंबीर नेतृत्वाचा हातात असल्याचा विश्वास देशवासीयांमध्ये निर्माण झाला आहे. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक चांगले निर्णय घेतले आहे. शिक्षक भरती सुरु केली आहे. शिक्षकांची जुनी पेन्शन योजना सुरु करण्याबाबत ते सकारात्मक आहेत. मात्र, काँग्रेस व विरोधक फेक नेरेटिव्ही पसरवत आहेत. त्याला नागरिक भूलणार नाहीत. नरेंद्र मोदी यांच्यावर नागरिकांचा मोठा विश्वास आहे. तो कायम राहणार आहे. त्यांचे तसेच, मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना विधानपरिषदेवर पाठवणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहराध्यक्ष बापू काटे म्हणाले की, भाजपचे शहरातील सर्व 14 मंडलाध्यक्ष जीव तोडून प्रचाराचे काम करत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक नंतर आज महायुती या व्यासपीठावर एकत्र आली आहे. एकत्र येऊन एकजुटीने काम करत आहोत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही मतदारसंघातून दोन्ही उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन विजयी करू, असा निर्धार व्यक्त केला.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी शहरात कमी मतदार आहेत. प्रत्येकी 25 मतदारांमागे एक जण नेमण्यास सर्वाधिक मते मिळतील. त्या दृष्टीने नियोजन असावे, अशी सूचना केली.
शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस म्हणाले की, खासदार श्रीरंग बारणे हे राजगड दौर्यावर असल्याने मेळाव्यास येऊ शकले नाहीत. शिवसेना तसेच, युवा सेना, महिला आघाडी हे निवडणुकीसाठी झटून काम करत आहेत. डॉ. स्मिता योगेश जाधव यांना शिवसेनेचा 100 टक्के पाठींबा आहे. त्या नक्की विजयी होतील असा शब्द देतो.
भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष तथा गटनेते कुणाल वाव्हळकर म्हणाले की, ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. दिल्ली, राज्यात तसेच, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या या दोन्ही जागांवर आपल्याला जिंकायचे आहे. मी स्वत: पदवीधर मतदार संघाचा मतदार आहे. पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने आम्ही शहरात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी काम करत आहोत.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर की, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही सुशिक्षित मतदारांची निवडणूक आहे. ती सर्वांनी गांभीर्याने घ्यावी. नेत्यांनी दिलेले आदेश सर्वांना पाळावेत. डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात नवीन पायाभरणी होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, युवा नेते पार्थ पवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी आदेश दिल्यापासून आम्ही कामाला लागलो आहोत. डॉ. स्मिता योगेश जाधव या माझ्या लहान बहिणी समान आहेत. त्यांना जास्तीत जास्त मतदान व्हावे, याकडे सर्वांने लक्ष द्यावे. त्याचा विजय पक्का आहे. मोरेश्वर शेडगे यांनी सुत्रसंचालन केले. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आभार मानले.
पिंपरी-चिंचवड शहरात महायुती एकसंघ :
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात महायुती एक दिलाने काम करत असल्याचे दिसून येत आहे. या मेळाव्यात सर्व घटक पक्षांचे सर्व आजी माजी पदाधिकारी एकत्र आले होते. डॉ. स्मिता योगेश जाधव व कौस्तुभ गावडे या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी सर्वांनी शड्डू ठोकले असून, पिंपरी-चिंचवड शहरातून सर्वांधिक मते त्यांना मिळवून देण्याचा निर्धार महायुतीच्या पदाधिकांनी व्यक्त केला आहे.
मत देण्यासाठी निवडणूक कर्मचार्यांनी दिलेल्या जांभळ्या रंगाच्या पेनचाच वापर करावा :
मतदान नेहमीप्रमाणे ईव्हीएम नसून, मतपत्रिका असणार आहे. त्यावर चिन्ह नसणार आहे. केवळ नाव आणि उमेदवाराचे छायाचित्र असते. निवडणूक कर्मचार्यांनी दिलेल्या जांभळ्या रंगाच्या पेनने नावापुढील चौकटीत 1 क्रमांक लिहायचा आहे. चौकट सोडून बाहेर क्रमांक लिहल्यास मत बाद होते.



















