
निगडीतील अप्पूघर येथे ४९ झाडांची बेकायदेशीर कत्तल – ठेकेदारावर FIR आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची आम आदमी पार्टीची मागणी
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- निगडी येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीच्या प्रसिद्ध अप्पूघर परिसरात ४९ झाडांची विनापरवाना बेकायदेशीर कत्तल केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या पर्यावरण-विरोधी कृत्याविरोधात आज आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात आम आदमी पार्टीने निदर्शनास आणून दिले की, अप्पूघर चालवणाऱ्या खासगी कंत्राटदाराने उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाकडून केवळ १३ झाडांच्या छाटणीसाठी परवानगी घेतली होती. प्रत्यक्षात मात्र नियम धाब्यावर बसवून ४९ झाडांवर खोडापासून कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. हा महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम, १९७५ चा स्पष्ट भंग असून महापालिकेच्याच जागेत हा प्रकार घडल्याने उद्यान विभागाचा या ठेकेदाराला अभय आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या वेळी आम आदमी पार्टीची प्रमुख मागणी :
१. संबंधित ठेकेदारावर तात्काळ महाराष्ट्र वृक्ष जतन कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करून त्याचा करार तात्काळ रद्द करावा.
२. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि अभय देणाऱ्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.
३. कत्तल केलेल्या झाडांच्या ठिकाणी तिप्पट संख्येने देशी प्रजातीची झाडे लावून त्याचे संगोपन करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर टाकावी.
७ दिवसाच्या आत यावर ठोस कारवाई झाली नाही, तर आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
हे निवेदन देताना आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, आप रिक्षा संघटना अध्यक्ष अंगद मुगळे, आप नेत्या कविता कोंडे देशमुख आदी उपस्थित होते.



















