
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करून पुढे जा!” – नवदुर्गा प्रियांका कुदळे यांचा महिलांना संदेश
शारदीय नवरात्रोत्सवातून स्त्रीशक्ती, स्वावलंबन आणि संघर्षाची प्रेरणा
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- शारदीय नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचा जागर करणारा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारा उत्सव आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होणारा हा उत्सव नवमीपर्यंत साजरा केला जातो. त्यानंतर विजयादशमीला दसऱ्याच्या सणाने या उत्सवाची सांगता होते. देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून अधर्म आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवला. त्यामुळे नवरात्र हा शक्ती, विजय आणि नवचैतन्याचा उत्सव मानला जातो.
याच पार्श्वभूमीवर नवदुर्गा प्रियांका कुदळे यांनी महिलांना “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करून पुढे जा,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गेने महिषासुराशी नऊ दिवस अखंड युद्ध करून दहाव्या दिवशी विजय मिळवला. देवीचा हा संघर्ष आजच्या महिलांसाठीही प्रेरणादायी आहे. आज प्रत्येक स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. मात्र, या संकटांसमोर हार न मानता धैर्याने उभे राहणे, शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम बनवणे आणि एकजुटीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे.
महिलांनी केवळ स्वतःच्या प्रगतीपुरते मर्यादित न राहता इतर महिलांनाही पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. शिक्षण, संघटन आणि संघर्ष यांच्या बळावर महिलांनी स्वावलंबी बनून समाजात आपले स्थान निर्माण करावे. देवी दुर्गेची शक्ती ही केवळ पूजेपुरती मर्यादित नसून प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासात, धैर्यात आणि संघर्ष करण्याच्या क्षमतेत आहे, असा संदेश नवरात्रोत्सवातून मिळतो.
स्त्रीशक्तीचा खरा सन्मान म्हणजे महिलांना समान संधी, सुरक्षित वातावरण आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक महिलेने स्वतःतील सामर्थ्य ओळखून आत्मविश्वासाने पुढे जावे, हाच नवदुर्गा प्रियांका कुदळे यांच्या संदेशाचा मुख्य आशय आहे.



















