
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवी परिसरात गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या वारंवार उद्भवत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत काही नागरिकांना नाइलाजाने विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याचे डॉ. गायकवाड यांनी म्हटले आहे.
स्वच्छ पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, उपकार नाही! असे सांगत त्यांनी प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली. संबंधित यंत्रणेने पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करावी, गढूळ पाण्याच्या समस्येचे कारण शोधावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास नागरिकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनी दिला आहे. तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आता या समस्येवर महापालिका प्रशासन काय कार्यवाही करते आणि सांगवीतील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा कधी सुरू होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



















