
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उल्लेखनीय प्रशासकीय सेवेबद्दल पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal – PPM) प्रदान करण्यात आले. मुंबईतील लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित पदक अलंकरण समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपती महोदयांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी विनय कुमार चौबे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले होते. त्यानुसार ९ ऑक्टोबर रोजी आयोजित समारंभात त्यांना हे पदक प्रदान करून गौरविण्यात आले.
विनय कुमार चौबे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या प्रशासकीय कार्याची आणि कर्तव्यनिष्ठेची पावती मानला जात आहे. त्यांच्या या गौरवामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.



















