
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पितृपंधरवड्यातील अविधवा नवमीच्या निमित्ताने चिंचवड गावात संजीवन समाधी घेतलेल्या श्रीमन महासाधु मोरया गोसावी यांच्या सुविद्य पत्नी सौ. उमामाता यांच्या स्मृतिदिन महोत्सवाचे यंदा २८ वे वर्ष आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागातून गेल्या अनेक वर्षांपासून हा महोत्सव श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून सातत्याने साजरा केला जात आहे.
अविधवा नवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता मंगलमूर्ती वाडा येथील प्रमुख विश्वस्त महाराज देव यांच्या पत्नी देववहिनी यांच्या हस्ते समाधी मंदिरातील अष्टभुजा देवीची ओटी भरण्याचा धार्मिक विधी होतो. यावेळी **‘उमा माता की जय’**च्या जयघोषात भाविक व सभासदांकडून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येते.
यानंतर चिंचवड गावातील श्रीराम मंदिर येथे महोत्सवाचे आयोजन केले जाते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात होते. श्रीसूक्त पठण, भजनी मंडळाचे भजन, मोरया गोसावींची पदे, धुपारती मंडळ व मोरया भक्तांची भक्तिसेवा असे विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी सादर केले जातात.
महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबरच स्त्री शक्ती, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जाणीव यावर व्याख्यान किंवा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला जातो. महोत्सवाच्या आदल्या रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धा घेतली जाते. यामध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामरक्षा, वक्तृत्व, आरती आदी विविध स्पर्धांचा समावेश असतो.
महोत्सवाच्या समारोपावेळी धुपारतीनंतर विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थी व महिलांना बक्षिसांचे वितरण केले जाते. तसेच उमामाता स्मृतिदिनाचा प्रसाद म्हणून लकी ड्रॉद्वारे पाच महिलांना साडी प्रसाद दिला जातो. उपस्थित भाविकांना शिरा प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता होते.
गेल्या २८ ते ३० वर्षांपासून महिला व ज्येष्ठ व्यक्तींच्या सहभागातून हा महोत्सव अखंडपणे सुरू आहे. या काळात अनेक नामवंत व्याख्याते व प्रबोधनकारांनी महोत्सवाला उपस्थिती लावून मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे, भाविकांकडून मिळणाऱ्या देणगीतूनच या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
श्रीमन महासाधु मोरया गोसावी यांच्या परिवाराच्या आध्यात्मिक परंपरेतील उमामाता यांचे योगदान स्मरणात ठेवत भक्ती, संस्कार, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारा हा महोत्सव चिंचवडच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग ठरला आहे.



















