
विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा पिंपरीत भव्य नागरी सत्कार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीनिमित्त शनिवारी पिंपरी येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते अण्णासाहेब बनसोडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या उद्देशाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य शैक्षणिक संकुल उभारण्यासह राज्यभर शिक्षणाचे जाळे विस्तारून दरवर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा संकल्प आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी अण्णासाहेब बनसोडे यांची संस्थेच्या शासकीय नियामक मंडळावर झालेली निवड योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
“अण्णा बनसोडे हे शरद पवार आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले नेतृत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करू,” असे आठवले यांनी नमूद केले.
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अण्णासाहेब बनसोडे यांना शुभेच्छा देताना संस्थेच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. मिळालेल्या अधिकाराचा उपयोग लोककल्याणासाठी करावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीस हातभार लावावा, असे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना अण्णासाहेब बनसोडे यांनी हा सत्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान असल्याचे सांगितले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जबाबदारी ही सन्मानापेक्षा मोठी जबाबदारी असून, संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणि प्रतिष्ठेत वाढ करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“शिक्षण म्हणजे केवळ पदवी किंवा नोकरी मिळवणे नव्हे. विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता, आत्मविश्वास, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे,” असे बनसोडे म्हणाले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व समान संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
बदलत्या काळात पारंपरिक शिक्षणासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. संस्थेतील विद्यार्थ्यांचा नावलौकिक देशासह जागतिक स्तरावर पोहोचावा, यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलास लांडे यांनी अण्णासाहेब बनसोडे यांच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास भंते राहुल बोधी, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त चंद्रशेखर कांबळे, नागसेन कांबळे, माजी महापौर योगेश बहल, मंगलाताई कदम, संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर अमर मुलचंदाणी, नगरसेवक राहुल भोसले, परशुराम वाडेकर, सिद्धार्थ बनसोडे, प्रिया अण्णासाहेब बनसोडे, सुनील मगरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत सुरेश निकाळजे, सूत्रसंचालन अक्षय मोरे, तर आभार अंजना गायकवाड यांनी मानले.



















