
जुनी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिर्डी, अहिल्यानगर येथे रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी साई दरबारी आयोजित कार्यक्रमात बी. डी. चेंज फाउंडेशन यांच्या वतीने जनता शिक्षण संस्था, दापोडी संचलित मराठी प्राथमिक शाळा, जुनी सांगवी येथील आदर्श शिक्षिका शितल भानुदास औटी यांना ‘आदर्श शिक्षिका महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत केलेले भरीव योगदान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच शिक्षणाप्रती असलेली त्यांची निष्ठा याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल शाळेच्या वतीने शितल औटी यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या यशामध्ये जनता शिक्षण संस्थेचे सचिव जावळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.



















