
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मिरवणुकीदरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आणि शैक्षणिक कार्याचा जागर करण्यात आला. ‘रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचविणारे महान शिक्षणमहर्षी’ म्हणून कर्मवीरांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत वातावरणात चैतन्य निर्माण केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक पार पडली. यावेळी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. सुहास निंबाळकर, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्य प्रो. डॉ. संगीता अहिवळे, कला विभागाच्या उपप्राचार्य प्रो. डॉ. कामायनी सुर्वे, पर्यवेक्षक प्रा. रूपाली जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ या विचारातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची प्रेरणा आजच्या पिढीने घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असा संदेश या जयंती सोहळ्यातून देण्यात आला.
जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीमुळे महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

















