
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान’ जाहीर करण्यात आले आहेत. यंदा दिव्यांग प्रवर्गातून पुणे येथील मानव कांबळे यांची या प्रतिष्ठित राज्यस्तरीय सन्मानासाठी निवड झाली आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यंदा पाच ज्येष्ठ नागरिक, एक ज्येष्ठ नागरिक संघ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या एका संस्थेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. वैयक्तिक सन्मानाच्या महिला विभागातून नवी मुंबई (रायगड) येथील वृषाली मगदुम आणि नांदेड येथील भागीरथी बच्चेवार यांची, तर पुरुष विभागातून लातूर येथील प्रकाश घादगिने आणि ठाणे येथील बबन पाटणकर यांची निवड झाली आहे. दिव्यांग प्रवर्गातून पुण्याचे मानव कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाची सन्मानार्थी संघ म्हणून, तर पुणे येथील जनसेवा फाउंडेशनची सन्मानार्थी संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारांचे वितरण ४ ऑक्टोबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित आनंद मेळाव्यात करण्यात येणार आहे. माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा होणार आहे.
सेवानिवृत्तीनंतरही आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करत नि:स्वार्थपणे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत संघटना व संस्थांचा यथोचित सन्मान व्हावा, हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे.



















