
– कार्यकर्त्यांसह इच्छुकांचे कार्यकारिणीच्या घोषणेकडे लक्ष
– सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यावर शहरप्रमुख चेतन पवार यांचा भर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर कार्यकारिणीची घोषणा लवकरच होणार आहे. शहरप्रमुख चेतन पवार यांनी कार्यकारिणीसाठी निवडलेल्या सक्रिय व सक्षम कार्यकर्त्यांची यादी सोमवारी (दि. २१) मुंबई येथे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे सुपूर्द केली. त्यामुळे नव्या शहर कार्यकारिणीच्या अधिकृत घोषणेकडे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जून २०२६ मध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक प्रभागातील विविध जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची संघटनात्मक क्षमता, पक्षातील सक्रिय सहभाग, सामाजिक कामातील योगदान तसेच पक्षाच्या कार्यक्रमांमधील सहभाग यांचा विचार करण्यात आला.
शहरप्रमुख चेतन पवार म्हणाले, “केवळ पदाची इच्छा व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी प्रत्यक्ष मैदानात सक्रियपणे काम करणाऱ्या आणि पक्ष संघटना वाढविण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रभागनिहाय कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातून सक्षम कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.”
गणेशोत्सवाच्या कालावधीतही शहरातील विविध प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर भर देण्यात आला. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील संघटनात्मक परिस्थिती, कार्यकर्त्यांचा सहभाग आणि पक्षाच्या कामकाजाबाबतची माहिती जाणून घेण्यात आली. त्यामुळे नव्या कार्यकारिणीत प्रभागनिहाय सक्रिय कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे.
नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी काळात पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे कार्यकारिणीत कोणाकोणाला स्थान मिळते, याकडे शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांसह शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कोट
कार्यकारिणीची यादी सोमवारी मुंबई येथे संजय राऊत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली असून, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.
– चेतन पवार, शहरप्रमुख, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, पिंपरी-चिंचवड (जिल्हा)



















