
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ३ व ४ सप्टेंबर २०२६ रोजी IEEE International Conference on Electronics, Computing, Communication and Networking Technologies (ICEC2NT-2026) या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भारतासह अमेरिका, सौदी अरेबिया आणि इराक येथील संशोधक सहभागी होणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी. मालती यांनी दिली.
या परिषदेत तब्बल २५० शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत. भारतातील विविध राज्यांमधील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांसह अमेरिका, सौदी अरेबिया व इराक येथील रिसर्च स्कॉलर्स आपल्या संशोधनाचे सादरीकरण करणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटिंग, कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानातील अद्ययावत संशोधनावर यावेळी चर्चा होणार आहे.
परिषदेसाठी बंगळुरू येथील डॉ. मनीष बाली आणि श्री. मयूर कौलवकर, साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रा. भुवन उन्हेलकर, वेल्स विद्यापीठाचे प्रा. इझेंडू अरिवा, फिलिप्स इंडियाचे संचालक आशिष शहा, व्हीजेटीआय मुंबईचे प्रा. डॉ. फारुख काझी, IEEE पुणेचे प्रमुख डॉ. अमर बुचडे तसेच संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
या मान्यवरांच्या उपस्थितीत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन कल्पना, संशोधन आणि ज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे. कॉम्प्युटर व आयटीसारख्या सॉफ्ट ब्रँचेसमधील तंत्रज्ञानाचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसारख्या कोअर ब्रँचेसमधील विद्यार्थ्यांना निश्चितच होईल, असे कॅम्पस डायरेक्टर रियर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी सांगितले.
प्रा. डॉ. पी. मालती, प्रा. डॉ. बी. बी. मुसमाडे, प्रा. डॉ. ऋतुजा देशमुख आणि प्रा. डॉ. प्रिती पाटील हे परिषदेचे संयोजक म्हणून काम पाहत आहेत.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी डी. वाय. पाटील आकुर्डी संकुलाचे चेअरमन सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील व स्नेहा तेजस पाटील, तसेच डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

















