
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा विधान परिषदेचे माननीय आमदार अमित गोरखे, कार्यकारी संचालक विलास जेऊरकर , उपाध्यक्षा अनुराधा गोरखे , व्यवस्थापिका डॉ. प्रिया गोरखे , संसाधन व्यवस्थापक समीर जेऊरकर सर, विश्वस्त अमोल गोरखे , प्राचार्या मृदुला गायकवाड तसेच उपमुख्याध्यापिका वैशाली हारुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यास युवा योगपटू व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड झालेले श्री. नितीन तानाजी पवळे तसेच,NDA परीक्षेत All India Rank 492 मिळवून Indian Naval Academy साठी निवड झालेले मास्ट. श्लोक नितीन राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नितीन तानाजी पवळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे फायदे आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विविध योगासने व योगकौशल्यांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आरोग्य, शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वासाचा संदेश मिळाला.
मास्ट. श्लोक नितीन राऊत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि देशसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कविता, भाषणे व सांस्कृतिक सादरीकरणातून राष्ट्रप्रेम व्यक्त केले. “भारत का परिचय” या विशेष सादरीकरणातून भारताची संस्कृती, सामर्थ्य आणि गौरवशाली परंपरेचे दर्शन घडले.
आमदार अमित गोरखे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. तसेच श्लोक नितीन राऊत आणि नितीन तानाजी पवळे यांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या प्रेरणादायी यशाची विशेष दखल घेतली. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली.
स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम, आरोग्य, शिस्त आणि संस्कारांचा संदेश देणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचा समारोप “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्”च्या जयघोषाने करण्यात आला.

















