अरविंद एज्युकेशन सोसायटीत शिवगर्जना, पोवाडे, नाटिका, नृत्य व ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लाॅवर इंग्लिश मीडियम स्कूल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवपाळणा, शिवगर्जना, पोवाडे, ढोल – ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांच्या चित्रांचे प्रदर्शन हे विशेष आकर्षण ठरले.
सरस्वतीची प्रतिमा व शिवमूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवरच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल पवार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिवगर्जना, पोवाडा, शिवपाळणा, शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही ऐतिहासिक नाटिका सादर केली. लाठीकाठी व रोमहर्षक तलवारबाजी यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय होवून गेले. विद्यार्थ्यांनी ‘आई अंबे जगदंबे’ या गाण्यावर नृत्य सादर केल्यानंतर तर ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. राजमुद्रा म्हणजे काय ? याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत आपणही शिवाजी महाराजांसारखी निष्ठा ठेवून आपले कार्य प्रामाणिकपणे साधले पाहिजे, असे सांगितले. सचिव प्रणव राव म्हणाले, की परिस्थितीवर रडायचे नाही तर लढायचे, हे शिवचरित्र शिकवते. मुख्याध्यापिका नीलम पवार, मुख्याध्यापिका आशा घोरपडे, प्राचार्य शीतल पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवरायांच्या विविध गुणांविषयी माहिती सांगून त्यातील एक तरी गुण आपण आत्मसात केला पाहिजे, असे सांगितले. शिक्षिका कीर्ती शिंपी व सुमित्रा कुंभार यांनी शिवजयंतीची माहिती सांगितली.
वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना शिवजयंतीचे औचित्य साधत आरती राव व प्रणव राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका रविना कांबळे, सुनिता ठाकूर, ज्योती फर्टियाल व तृप्ती जगताप यांनी केले.
सूत्रसंचालन विद्यार्थिनी पूर्णा मुदलियार, अंतरा बिरादार यांनी; तर आभार शिक्षिका तृप्ती जगताप व रविना कांबळे यांनी आभार मानले.