
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभागातील घरकुल चौक, कुदळवाडी चौक ते कृष्णानगर संविधान चौक या मार्गावर सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत स्थानिक नगरसेवक निलेश नेवाळे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष स्थळाची संयुक्त पाहणी करून तातडीच्या उपाययोजनांवर चर्चा केली.
या पाहणीत वाहतूक विभागाचे घाडगे साहेब, फ प्रभागाचे अतुल पाटील साहेब, स्थापत्य विभागाचे चौरे साहेब, बीआरटी विभागाचे लाडे साहेब, फ प्रभाग अध्यक्षा शिवानी नराळे तसेच सहकारी नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण मार्गाची पाहणी करून वाहतूक कोंडीची कारणे, तांत्रिक अडचणी, रस्त्याची परिस्थिती, वाहतुकीचा वाढता ताण आणि आवश्यक सुधारणा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
पाहणीदरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने उपाययोजना राबविण्याच्या तसेच दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. चौकांमधील वाहतूक नियोजन, सिग्नल व्यवस्थेतील सुधारणा, अतिक्रमणांवर कारवाई आणि रस्त्यावरील अडथळे दूर करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी स्थानिक नगरसेवक निलेश नेवाळे, कुंदन गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांना सुरक्षित, सुरळीत आणि कोंडीमुक्त वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधून पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे नगरसेवक निलेश नेवाळे यांनी सांगितले.
या संयुक्त पाहणीनंतर लवकरच आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी होऊन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
















