
कोल्हापूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डॉ. डी. वाय. पाटील यांचे बुधवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल होते. महाराष्ट्रामध्ये शिक्षणसम्राट ह्या उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय.पाटील ह्यांना १९९१ साली पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूरमधील अंबप गावात झाला होता. कोल्हापूरच्या मातीतले रांगडे व्यक्तिमत्त्व होते.
डॉ. डी वाय पाटील यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे काम आहे. त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. त्यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या.
डी. वाय. पाटील यांनी राज्यात मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्रात व इतरत्र अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करत शिक्षणाची ज्ञानगंगा अनेक विद्यार्थ्यांसाठी खुली केली. राजकीय-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले.
















