
ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी मार्गात वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’कडून सलग ६ व्या वर्षी अविरत सेवा!
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- आषाढी वारीच्या भक्तीमय वातावरणात विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने पडत असताना, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’’ची आरोग्य वारी’ वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेत रुजू झाली. लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, आमदार शंकरभाऊ जगताप मित्र परिवार, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ही सेवा रुजू करण्यात आली . या आरोग्य वारीच्या माध्यमातून लाखो वारकऱ्यांना पालखी मार्गात आरोग्यसेवा देण्यात आल्या.
‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या पुढाकारातून दरवर्षी देहू आणि आळंदी या दोन्ही पवित्र तीर्थक्षेत्रांतून या आरोग्य वारीचा प्रारंभ होतो. पालखी प्रस्थान झाल्यापासून थेट पंढरपूरपर्यंत ही आरोग्य सेवा वारकऱ्यांच्या सोबत चालत राहते . यामध्ये सुसज्ज व्हॅन त्यासोबतच पॅरामेडिकल स्टाफ, अनुभवी डॉक्टर्स आणि सर्व प्रकारची आवश्यक औषधे घेऊन वैद्यकीय पथके पालखी मार्गावर मार्गक्रमण करतात. वारीच्या दरम्यान वारकऱ्यांना उद्भवणाऱ्या किरकोळ व गंभीर आजारांवर त्वरित उपचार मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
स्व. लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी नेहमीच आरोग्य सेवेला प्राधान्य दिले. त्यांच्याच प्रेरणेतून आरोग्यवारीची संकल्पना पुढे आली. गोसेवक, प्रसिद्ध उद्योजक विजय जगताप यांच्या माध्यमातून पालखी मार्गातील या आरोग्य सेवेला बळ मिळाले. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा सलग 6 व्या वर्षी पालखी मार्गात चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वारीने आपली सेवा वारकऱ्यांच्या चरणी रुजू केली. दिवसभर चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायांना येणारे फोड, सूज आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी आरोग्य वारीत विशेष व्यवस्था करण्यात आली. *पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या पायांची तपासणी करून त्यांच्या पायांना कास्यथाळी मशीनद्वारे मालिश (मसाज) करून दिली गेली.* वारकऱ्यांच्या पायांची मालिश करण्यासाठी साधारण दीड हजाराहून अधिक मशीन कार्यरत होत्या. लोकनेते स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप पॅरामेडिकलचे विद्यार्थी आणि आर्ट ऑफ लिविंगच्या साधकांनी अत्यंत आपुलकीने आणि श्रद्धेने वारकऱ्यांना ही आरोग्य सेवा दिली . कडक ऊन, पाऊस किंवा शारीरिक थकवा यामुळे त्रस्त असलेल्या वारकऱ्यांना या मायेच्या सेवेमुळे अतिशय मोठा दिलासा मिळाला.
लाखोंच्या संख्येने असणाऱ्या वारी सोहळ्यात गर्दीमुळे किंवा अचानक उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे काही अनुचित घटना घडल्यास, हे वैद्यकीय पथक त्वरित धावून जाते. प्रथमोपचार आणि आवश्यक ते तातडीचे उपचार वेळेत उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक वारकऱ्यांना तातडीने मदत मिळते आणि त्यांना पुढील प्रवासासाठी मोठी ऊर्जा मिळते. पालखी मार्गावरील ही आरोग्य यंत्रणा वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. या आरोग्य वारीने लाखो वारकऱ्यांच्या चरणी आपली सेवा रुजू केली आहे.
वारकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आधारवड!
या अनोख्या आणि पवित्र संकल्पनेचे मुख्य शिल्पकार ज्येष्ठ गोसेवक व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उद्योजक विजुशेठ जगताप हे आहेत. वारकऱ्यांच्या निस्सीम भक्तीची आणि शारीरिक कष्टांची जाणीव ठेवून त्यांनी सहा वर्षांपूर्वी या उपक्रमाची पायाभरणी केली. आज चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अहोरात्र परिश्रमांतून ही आरोग्य वारी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि अखंडपणे सुरू आहे.’ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल’च्या जयघोषात चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून राबवला जाणारा हा उपक्रम संपूर्ण पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे. असे रुग्ण कल्याण समिती औंध जिल्हा रुग्णालय, जिल्हा आयुष रुग्णालय सदस्य डॉ देविदास शेलार यांनी सांगितले. तर यंदा आरोग्यवारीमध्ये डॉ. दीपक खोडवे, डॉ दिलीप सातव यांचे योगदान या वारीसाठी मिळाले.















