
संभाजी बाळासाहेब बारणे यांच्या पुढाकारातून उपक्रम; नागरिक, ज्येष्ठ समाजसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त थेरगाव परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा १,००० तुळशी रोपांचे मोफत वाटप हा उपक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संभाजी बाळासाहेब बारणे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या कार्याचा आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी संभाजी बाळासाहेब बारणे म्हणाले, “अजितदादांच्या आठवणी केवळ भावनिक नाहीत, तर समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी विकासासोबतच समाजकारण आणि जनसेवेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम राबविण्यात आला आहे.”
उपक्रमांतर्गत थेरगाव परिसरातील नागरिकांना तुळशीची रोपे मोफत वितरित करण्यात आली. पर्यावरण संरक्षण, हरित शहर आणि स्वच्छ परिसराचा संदेश देत नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोपांचे संगोपन करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी समाजकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या काही व्यक्तींचा विशेष सन्मानही करण्यात आला.
२२ जुलै हा दिवस स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आला असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्याला अभिवादन करत, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.















