
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पात बुधवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. सततच्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याच्या प्रचंड ढिगाऱ्याचा भाग घसरून प्रकल्पाच्या मुख्य इमारतीवर पडल्याने इमारत कोसळली. या दुर्घटनेत किमान १४ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असून जीवितहानीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याच्या उंच ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी मुरले होते. त्यामुळे वजन वाढून कचऱ्याचा संपूर्ण ढिगारा घसरत थेट प्रकल्पाच्या इमारतीवर आदळला. या जबर धडकेमुळे इमारतीचा मोठा भाग क्षणार्धात कोसळला आणि आत काम करणारे कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी, पोकलेनसह इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. कचऱ्याचा ढिगारा अत्यंत मोठा असल्याने बचावकार्य करताना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातच सुरू असलेल्या पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत असूनही अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, आषाढी वारी बंदोबस्तासाठी पोलीस दलातील मोठा फौजफाटा आधीच विविध ठिकाणी तैनात असल्याने या दुर्घटनेनंतर उपलब्ध पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. अतिरिक्त मनुष्यबळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून बचाव आणि मदतकार्याला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दुर्घटनेचे नेमके कारण, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांची संख्या आणि मृतांचा अधिकृत आकडा याबाबत प्रशासनाकडून माहिती संकलित केली जात असून, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. या भीषण दुर्घटनेमुळे मोशी परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.



