
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिक सहभागी झाले होते. गेल्या सहा वर्षापासून “पिंपरी चिंचवडकर साहित्यिकांची दिंडी” व्यापक आध्यात्मिक विचार घेऊन तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... हा “झाडे लावा, झाडे जगवा..! संदेश यानिमित्त देण्यात आला. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ।’
या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा जागर हाती फलक घेऊन करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिकांनी अभंग, गवळण म्हणत आणि रामकृष्णहरी नामाचा गजर करीत पिंपरी चिंचवड शहरातील भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतले.
पारंपारिक वेषात, हाती टाळ घेऊन शहरातील साहित्यिक या वारीत सहभागी झाले होते.
संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेतील ह.भ.प. प्रकाश घोरपडे यांनी भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतले.
फेर धरून, फुगड्या खेळून, हरिनामाचा गजर करीत साहित्यिकांनी दिंडीचा परमानंद घेतला.
विसाव्याच्या ठिकाणी हेमंत जोशी, तानाजी एकोंडे, कैलास भैरट, सुभाष चटणे , संजय गमे, शामराव सरकाळे, सुरेश कंक, मल्लिकार्जुन इंगळे, सुरेंद्र विसपुते यांनी भावपूर्ण अभंग, गवळणी, कविता सादर केल्या. सुहास घुमरे यांनी वारीतील या आध्यात्मिक कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.
ह.भ.प. अशोक महाराज गोरे, मुरलीधर दळवी, दत्ता कांगळे, शिवाजीराव शिर्के, शरद काणेकर, संपत शिंदे, हनुमंत भोसले, सुभाष चव्हाण, मुकुंद जोशी, बाळासाहेब कुंभार, अभय जोशी, अनंत पाठक यांनी दिंडीचे संयोजन केले.
आकुर्डीतील तुळजाभवानी मंदिराजवळ दिंडीची सांगता झाली.



