
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील दुमजली इमारत कचऱ्याच्या डोंगराखाली कोसळल्यानंतर अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू ठेवले आहे. घटनास्थळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून बचाव मोहिमेचा आढावा घेतला. वेळ लागला तरी प्रत्येक अडकलेल्या कर्मचाऱ्याची सुखरूप सुटका करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गेले काही दिवस पाऊस सुरू असल्याने मोशीतील कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर ढासळला. त्यामुळे एक इमारत कोसळली. या इमारतीत एकूण २३ कर्मचारी होते. त्यातील पाच कामगार वरच्या मजल्यावर असल्याने उड्या घेऊन बचावले. मात्र, १८ कामगार कचरा आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. त्यातील सहा कामगारांना एनडीआरएफ आणि आर्मी जवानांनी सुखरूप बाहेर काढले. उर्वरित १२ जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातील तीन जणांशी संपर्क झाला आहे. त्यांना बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. वेळ लागला तरी चालले मात्र, सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न होतील.
-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
मोशी कचरा डेपोत कचऱ्याचा मोठा ढीग ढासळल्याने दुमजली प्रशासकीय इमारत कोसळली आहे. या इमारतीत २३ जण अडकले आहेत. त्यातील पाच जण सुखरुप बाहेर आले आहेत. सहा जणांना बचाव पथकाने बाहेर काढले. उर्वरितांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
-विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका, पिंपरी-चिंचवड
दुर्घटनेनंतर सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, उर्वरित अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात असून, मी स्वतः परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
-विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड



