
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि विविध ठिकाणी झालेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमुळे पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही प्रमुख मार्गांवरील वाहतुकीला याचा फटका बसला असून खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना तूर्तास प्रवास न करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील ‘कनेक्टिंग लिंक’ आणि ‘मिसिंग लिंक’च्या दरम्यान एक काँक्रीटचा पिलर कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर सततच्या मुसळधार पावसामुळे जुन्या महामार्गावर काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हा मार्गही बंद करण्यात आला आहे.
मावळ आणि ताम्हिणी घाट परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे-मुंबईला जोडणारे हे पर्यायी मार्गही पाण्याखाली गेल्यामुळे सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
लोहगड किल्ल्याजवळ दरड कोसळली; कुटुंब अडकल्याची भीती
लोहगड किल्ल्यानजीक असलेल्या पाटण गावाजवळ मोठी दरड कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दरडीच्या ढिगाऱ्याखाली एक कुटुंब अडकल्याची प्राथमिक माहिती असून, प्रशासनाकडून तातडीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.



